
आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम सप्टेंबर 2019 मध्ये नव्याने सुरू करण्यात आले होते, मात्र ते अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आरोग्य तपासणीकरिता ओपीडीमध्ये येणारे रुग्ण आणि गरोदर मातांना येथील अपुऱ्या जागेमुळे त्रास सहन करावा लागत आहे. अजून किती दिवस आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण होण्याची वाट बघायची, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
दापोली तालुक्यात आंजर्ले येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत नव्याने बांधण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 1 कोटी 20 लाख रुपये मंजूर झाले. या कामाचा भूमिपूजन सोहळा कार्यक्रम सप्टेंबर 2019 मध्ये मोठ्या दणक्यात संपन्न झाला. सप्टेंबर 2019 ते मार्च 2023 पर्यंतच्या तब्बल साडेतीन वर्षांत या कामाने म्हणावी तशी अद्यापही गतीच घेतलेली नाही. याचा परिणाम येथील आरोग्य यंत्रणेवर होत असून जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदारपणामुळे नव्याने बांधण्यात येणारी इमारत पूर्ण होत नाही.
या साऱ्या परिस्थितीला जिल्हा परिषदेचा बांधकाम विभागच जबाबदार असून संबंधित बांधकामावर देखरेख करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कडक कारवाई करायला हवी तसेच ठेकेदार दिलेल्या मुदतीत काम करत नसेल तर त्यालाही काळ्या यादीत टाकायला हवे होते, कारण आरोग्यासारख्या महत्त्वाच्या अशा लोकांच्या जीवन-मरणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याशिवाय त्यांना वळण लागणार नाही. लोकप्रतिनिधींनी रक्ताचे पाणी करून निधी मंजूर करून आणायचा. या विकास निधीचे काम किती दिवस रखडत ठेवायचे यालाही काही मर्यादा आहेत. त्यात आरोग्यासारख्या लोकांच्या जीवनाशी निगडीत विषयातसुद्धा निधी उपलब्ध असताना चालढकल होत असेल, तर काय म्हणावे या शासन यंत्रणेला, असा प्रश्न आंजर्लेतील नागरिकांच्या मनात येत आहे.
आंजर्ले, मुर्डी, कोंगळे, सुकोंडी, देहेण,साकुर्डे, वेळवी, कादिवली, कुडावले,टांगर, शिरसोली, शिरसेश्वर, आवाशी, ताडील आणि बांधतिवरे या ग्रामपंचायतींच्या अखत्यारीतील 23 महसुली गावांसाठी आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रापासून काही गावे तर 20 किमी अंतरापेक्षा अधिक अंतरातील लांबीपासून दूर असलेल्या काही गावांचाही समावेश आहे.





















































