पैठणच्या ‘जलयुक्त’ अभियानात कंत्राटदाराने जिरवले २३ लाख

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पैठण

जलजागृती करण्यासाठी राज्यात सरकार, विविध संघटना, सेवाभावी संस्था व सेलिब्रिटींनी मोहिमा हाती घेतलेल्या आहेत. लोकसहभागही वाढत आहे. असे असताना पाण्याऐवजी पैसा जिरवण्याचा उद्योग केला जात आहे. असाच एक प्रकार पैठण तालुक्यातील आडगाव-जावळे या गावात घडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सव्वा तेवीस लाखांचे सिंचन करणाऱ्या या कंत्राटदारावर गुन्हा दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सिमेंट नाला बंधाऱ्यांच्या कामात शासनाची २३ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या आदेशानंतर याबाबत कंत्राटदार प्रकाश मारकड यांच्याविरोधात पाचोड पोलीस ठाण्यात ४२० कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २ वर्षांपूर्वी झालेल्या या आर्थिक घोटाळ्याची पोलखोल करण्यासाठी पैठण-फुलंब्रीचे महसूल उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर ही अफरातफर समोर आली असून, या कारवाईमुळे कंत्राटदारांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

जिल्हा जलयुक्त अभिमान अंतर्गत लघुसिंचन (जलसंधारण विभाग, संभाजीनगर कार्यालय) यांनी आडगाव-जावळे (ता.पैठण) येथे २ सिमेंट नालाबांध तयार करण्यासाठी निविदा काढल्या होत्या. निविदा प्रक्रिया २ डिसेंबर २०१६ ते २१ मे २०१७ या दरम्यान पार पडली. त्यानुसार अनुक्रमे १६ लाख ८९ हजार व १५ लाख ४४ हजार असे एकूण ३२ लाख ३३ हजारांचे हे काम कंत्राटदार प्रकाश बाळकृष्ण मारकड यांनी घेतले. मूळ अंदाजपत्रकापेक्षा तब्बल १०.८७ टक्के कमी दराच्या रकमेची निविदा त्यांनी भरल्यामुळे प्रशासनाने तिला मंजुरी दिली. कार्यारंभ आदेश घेतल्यानंतर कंत्राटदार मारकड यांनी अत्यंत थातूरमातूर काम केले. ३ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांना ८ लाख ८८ हजार ८७७ रुपयांचा धनादेश देण्यात आला. परत ३१ मार्च २०१८ रोजी १४ लाख ३६ हजार ९२४ रुपये एवढ्या रकमेचा धनादेश देण्यात आला. असे एकूण २३ लाख २५ हजार ८०१ रुपये कंत्राटदाराने काढून घेतले. प्रत्यक्षात मात्र कामाचा दर्जा नसल्यामुळे तक्रारी झाल्या.

या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २० जून २०१८ रोजी चौकशी समिती नेमली. समितीचे अध्यक्ष एसडीएम भाऊसाहेब जाधव, सदस्य तथा तहसीलदार महेश सावंत, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी (अर्थ विभाग) विष्णू बोरुडे व संभाजीनगर पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता बी. व्ही. वाघमारे यांच्या समितीने सखोल चौकशी केली. अवघ्या २ महिन्यांत २९ ऑगस्ट २०१८ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. यात कंत्राटदार प्रकाश मारकड यांनी दर्जाहीन काम करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार पैठण तालुका जलयुक्त शिवार अभियान समितीचे तालुकाध्यक्ष तथा तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब पायघन यांनी पाचोड पोलीस ठाण्यात तपशीलवार तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक गोरक्षनाथ खराद यांनी कंत्राटदार मारकड यांच्याविरुद्ध भादंवि ४२० कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.