
मुंबईत कोरोनाच्या दुसऱया लाटेत झपाटय़ाने वाढणारी रुग्णसंख्या आता चांगलीच आटोक्यात आली असून रुग्ण दुपटीच्या कालावधी शतकपार गेला आहे. 1 एप्रिल रोजी रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण 49 दिवस होते, मात्र 2 मे रोजी हेच प्रमाण 103 दिवसांवर गेले आहे. म्हणजेच एकाच महिन्यात रुग्ण दुपटीचा कालावधी 54 दिवसांनी वाढला आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेत मुंबईतील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढल्यामुळे 500 दिवसांपर्यंत गेलेला रुग्ण दुपटीचा कालावधी मार्चमध्ये थेट 40 दिवसांपर्यंत खाली आला होता. दररोजच्या रुग्णसंख्येने दहा हजारांचा आकडा पार केल्याने पालिकेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र राज्य सरकार, पालिका यांच्या माध्यमातून कठोर निर्बंध आणि खबरदारी-नियमांच्या अंमलबजावणीमुळे मुंबईत रुग्णसंख्या आता चांगली नियंत्रणात आली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
- मुंबईत एप्रिलमध्ये रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही चांगलीच सुधारणा झाली आहे. 1 एप्रिलच्या आकडेवारीनुसार रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84 टक्के होते. हेच प्रमाण आता 89 टक्क्यांवर आले आहे.
- कोरोनाच्या दुसऱया लाटेआधी कमालीचा घटलेला रुग्णवाढीचा दर 1.38 टक्क्यांवर गेला होता, मात्र सद्यस्थितीत कोरोना रुग्णांच्या वाढीचा दर 0.66 टक्क्यांवर खाली आला आहे.
चाचण्या वाढल्या, पॉझिटिव्हिटी रेट घटला!
- मुंबईत पूर्ण फेब्रुवारी महिन्यात केवळ 18 हजार 322 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. फेब्रुवारीच्या मध्यावर आलेल्या कोरोनाच्या दुसऱया लाटेत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत गेली. मार्चमध्ये एकाच महिन्यात 95 हजार 741 तर एप्रिल महिन्यात मुंबईत तब्बल 2 लाख 32 हजार 844 रुग्ण आढळले. कोरोनाच्या दुसऱया लाटेत वेगाने प्रसाराच्या कोरोना विषाणूच्या नव्या स्टेनमुळे ही वाढ झाल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
- मात्र या काळात चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आणि चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्ह आढळणाऱया रुग्णांची संख्या कमी झाली. शिवाय आता रुग्णसंख्याही घटली असून रुग्ण बरे होण्याचा दर वाढला आहे. तर दुपटीच्या कालावधीत चांगलीच सुधारणा झाली असून रुग्णवाढीचा दरही घटला आहे.

































































