
कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी मुंबई लोकलचा प्रवास 15 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केल्यानंतर पालिकेनेही आपले पूर्ण नियोजन असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये पालिका, राज्य सरकारच्या समन्वयातून दोन दिवसांत अॅप बनवण्यात येणार असून वॉर्ड कार्यालयात ऑफलाइन आणि रेल्वे व पालिकेच्या समन्वयाने 65 रेल्वे स्थानकांवर ‘सिस्टम’च्या माध्यमातून रेल्वे तिकीट-पाससाठी क्यूआर कोड मिळण्याची व्यवस्था केली जाईल, अशी माहिती पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी आज दिली.
- राज्य सरकार आणि रेल्वेसोबतही पालिकेचा समन्वय सुरू आहे.
- राज्याचे प्रधान सचिव असिम गुप्ता दोन दिवसांत क्यूआर कोडसाठीच्या अॅपबाबत घोषणा करतील.
- अॅपच्या माध्यमातून घरबसल्या क्यूआर कोड मिळाल्यानंतर तिकीट खिडकीवर तिकीट-पास मिळणार
आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल आणि प्रार्थनास्थळांचे काय? आज एसओपी तयार होणार
हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल आणि प्रार्थनास्थळांचे निर्बंध शिथिल करण्याबाबत टास्क फोर्स मंगळवारी एसओपी तयार करेल, अशी माहिती आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज टास्क फोर्सची बैठक घेतली. थिएटर, मॉल, रेस्टॉरंट आणि प्रार्थनास्थळांवरील निर्बंधांमध्ये शिथिलता कशी आणता येईल यावर या बैठकीत चर्चा झाली. तसेच संभाव्य तिसऱया लाटेत ऑक्सिजनची गरज, लसीकरणाचा वेग आणि कॉण्टॅक्ट-ट्रेसिंग वाढवणाऱयावरही चर्चा झाली. या बैठकीला मुख्य सचिव सीताराम कुंटे, डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. मेहुल मेहता, डॉ. झहीर इराणी, डॉ. राहुल पंडित, डॉ.सुहास प्रभू, डॉ. अजित देसाई, डॉ. ओम श्रीवास्तव, डॉ. उदवाडिया आदी उपस्थित होते.
रेल्वे प्रशासनाला विश्वासात घेऊनच निर्णय
दोन डोस घेतलेल्यांसाठी रेल्वे सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारशी टास्क फोर्स, पालिका आणि रेल्वे प्रशासनाचा योग्यरीत्या समन्वय असल्याचेही पालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. 5 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वे महाप्रबंधक अनिल लोहाटी, डीआरएम गोयल यांनी पालिका मुख्यालयात आपल्याशी तासभर सकारात्मक चर्चा केल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. यावेळीच दोन डोसनंतर 14 दिवस झालेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यावर एकमत झाल्याचे सांगतानाच समन्वयासाठी अजूनही बैठका सुरूच असल्याचे ते म्हणाले.
मुंबई ‘एमएमआर’ रिजनमधील 32 लाख प्रवाशांचे नियोजन
मुंबई लोकलचे दररोजचे सुमारे 80 लाख प्रवासी आहेत. सद्यस्थितीत मुंबईत दुसरा डोस घेतलेले 19 लाख आणि ठाणे, वसई-विरार, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, अंबरनाथ, ठाणे, मिरा-भाईंदर अशा दहा महापालिका मिळून 32 लाख प्रवासी सद्यस्थितीत रेल्वे प्रवासासाठी पात्र ठरतील. दुसरा डोस घेणाऱयांची संख्या वाढतच जाणार आहे. त्यामुळे या प्रवाशांची क्यूआर कोड मिळवण्यासाठी वॉर्डमध्ये गर्दी होऊ नये यासाठी आणि इतर पात्र प्रवाशांच्या सोयीसाठी 65 रेल्वे स्थानकांवर व्यवस्था केली जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
क्यूआर कोड मॉल, रेस्टॉरंट, जीममध्येही लागेल
कोरोना लसीचा दुसरा डोस मिळाल्यानंतर मिळणारा क्यूआर कोड सर्टिफिकेट आगामी काळात मॉल, रेस्टॉरंट, जीममध्ये ग्राह्य मानले जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणाबाबत कोणताही गैरसमज न ठेवता लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





























































