
कोरोना महामारीचा जबर फटका मुंबईसह राज्यातील रिअल इस्टेट क्षेत्राला बसला. अनेक ठिकाणी घरांच्या किंमतीत चढउतार पहायला मिळाल्यानंतर आता निवासी घरभाडय़ांच्या दरांमध्ये देखील मोठी घसरण झाली आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात नेहमीच्या तुलनेत घरभाडे 20 ते 30 टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी भाडेकरू मिळत नसल्याची तक्रार देखील पुढे आली असून अनेक ठिकाणी मालकांनी दलाली देखील वाढवून देण्याची कल्पना लढविली आहे.
लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्राला फटका बसला. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱया गेल्या, तर अनेकांना पगार कपातीला सामोरे जावे लागले. याचा थेट फटका मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रावर बसला आहे. सध्या मुंबईतील विविध भागांत घरांसाठी जे घरभाडे आकारले जात होते. त्या घरभाडय़ांमध्ये आता घसरण झाल्याचे दिसून आले आहे. अनेक ठिकाणी भाडय़ाच्या किंमती शहरात 25 ते 30 टक्क्यांपर्यंत खाली आल्या आहेत. यासारख्या परिस्थितीत मालकांना घरे ताब्यात ठेवण्यासाठी भाडे कमी करण्यास भाग पाडले जात आहे. तर ठाणे अप्पर ठाणे, मीरा रोड, नवी मुंबई, मालाड येथे भाडय़ाने मागणी वाढत असल्याचे नेस्टवे टेलॉजीजचे वरिष्ठ संचालक सतीश सोनवले यांनी सांगितले.
- कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आल्याने अनेकांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेत आपल्या मूळ गावी जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक मूळ मालकांना फटका बसला
- नोकर कपात, पगार कपात आणि संस्था बंद झाल्यामुळे अनेकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे बऱयाच जणांनी कमी भाडय़ांच्या घराला पसंती दर्शविली आहे.
- नोकरीची अनिश्चितता असल्याने अनेकांनी नवीन घरात न जाण्याचा निर्णय घेत आहेच त्या ठिकाणी भाडय़ाने राहण्यास सुरुवात केली आहे.
- अनेक भाडोत्री सध्या गावी राहण्यास गेले आहेत. त्यामुळे मुंबईत बऱयाच ठिकाणी घरे रिकामी झाल्याची माहिती पुढे आली आहे.
- लहान घरांकडे ओढा वाढला असून त्यासाठी कमी भाडय़ाची मागणी होऊ लागली आहे.
- घर रिकामे राहू नये म्हणून मालकांकडून 10 ते 20 टक्के अधिक दलालीचा पर्याय अवलंब केला आहे.
कोरोनामुळे मुंबईतील अनेक परप्रांतीय आपल्या मूळ गावी परतले आहेत. त्यामुळे सध्या अनेक ठिकाणी भाडोत्री मिळत नसल्याची तक्रार पुढे आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अशी परिस्थिती कधीच पाहिली नव्हती. अनेक ठिकाणी 10 टक्क्यांपासून ते 50 टक्क्यांपर्यंत घरभाडे कमी करण्याची केळ आली आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱया गेल्या असल्याने त्याचा फटका देखील रिअल इस्टेटला बसला आहे. – राकेश कनैजिया, रघुकल रिअल इस्टेट





























































