सावधान…कोरोना व्हायरस करतोय मेंदूवर हल्ला; संशोधनातील निष्कर्ष

कोरोना संक्रमणात ताप, सर्दी, खोकला, थकवा येणे, घशात खवखव, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळतात. मात्र, कोरोनाच्या काही रुग्णांमध्ये संभ्रम, गंध आणि चव न समजणे, स्वभावात बदल असे काही मानसीक आजारही दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या मेंदूवर हल्ला करत असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. कोरोनाच्या अनेक रुग्णांचे मानसीक संतुलन बिघडल्याचे आणि अनेकांमध्ये नकारात्मकता वाढल्याचे दिसून येत आहे. काही रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानंतरही अशी लक्षणे दिसून येत असल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाचा कहर वाढत असताना कोरोनाचा आरोग्याला असणारा धोकाही आता वाढला आहे.

अर्धांगवायूचा धक्का, ब्रेन हेमरेज आणि विस्मृतीसारखी लक्षणे कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांपैकी 60 टक्के रुग्णांमध्ये मानसीक आजाराची लक्षणे दिसत असल्याचे जॉन्स होपकिन्स युनिव्हर्सिटीचे संचालक रॉबर्ट स्टीवन्स यांनी सांगितले. कोरोना नेमका मेंदूवर कसा हल्ला चढवतो, याबाबत संशोधन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या अनेक रुग्णांमध्ये संभ्रम, शुद्ध हरपणे, अर्धांगवायूचा धक्का, गंध, चव न कळणे, डोकेदुखी, विचारांची गुंतागुंत, लक्ष केंद्रीत न होणे अशा समस्या वाढल्याचे त्यांनी सांगितले. काही रुग्णांच्या स्वभावात मोठे बदल दिसून आल्याचेही त्यांनी सांगितले. लिडिंग सायन्स जर्नलमध्ये याबाबतचा अहवाल प्रकाशित झाला आहे.

काही रुग्णांमध्ये अर्धांगवायूचा धक्का आणि रक्ताभिरण क्रियेत अडथळा आल्यास निर्माण होणाऱ्या समस्याही दिसून आल्या आहेत. कोरोना व्हायरस आता मेंदूपर्यत पोहचू शकत असेल तर त्याचा धोका अनेकपटींनी वाढल्याचे संशोधकांनी सांगितले. चीन आणि जपानमध्ये काही रुग्णांच्यामणक्यातील मज्जारज्जूमध्ये कोरोना व्हायरस आढळला होता. तर स्पेनमध्ये एका रुग्णांच्या मेंदूच्या पेशींमध्ये कोरोना आढळला होता. कोरोना रक्तवाहिन्या आणि पेशींच्या माध्यमातून मेंदूपर्यंत पोहचून हल्ला करत असल्याने अनेक रुग्णांमध्ये मानसीक समस्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. कोरोनाबाधित व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होत असल्याचे दिसून आले आहे. शरीरातील उती आणि अस्थिभंगासारख्या समस्या रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने निर्माण होण्याची शक्यता असते.

कोरोनामुळे शरीरासोबतच मेंदूलाही ऑक्सिजनचा कमी पुरवठा होत असल्याने अनेक रुग्णांमध्ये मानसीक समस्या वाढल्याचे दिसून आले. तसेच मधूमेह, रक्तदाब किंवा इतर आजार असणाऱ्या कोरोनाबाधित व्यक्तींना शुद्ध हरपणे किंवा कोमात जाणे अशाही समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. कोरोनाच्या रुग्णांमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गाठी होण्याची समस्याही दिसून येते. त्यामुळे रक्तप्रवाहात अडथळे निर्माण होतात. या गाठीमुळे मेंदूला होणाऱ्या रक्तपुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्यास अर्धांगवायूचा धक्का येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे कोरोना मेंदूवर नेमका कशाप्रकारे हल्ला करतो, यावर अधिक संशोधनाची गरज व्यक्त होत आहे. मात्र, या संशोधनामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढल्याचे दिसून येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या