
राज्यात मुंबई, पुणे वगळता अन्य जिह्यांत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत अद्यापही हवी तशी घट झालेली नाही. अशा परिस्थितीत कोरोना साखळी तोडायचीच असा निर्धार राज्य सरकारने केला आहे. राज्यात 22 एप्रिल रोजी सायंकाळी 8 वाजल्यापासून ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू करण्यात आलेले कडक निर्बंध आता 1 मेपासून 15 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत वाढविण्यात आले आहेत. याविषयीचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आज जाहीर केले.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 65 हजारापार कायम राहत असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर इंजेक्शन तसेच रुग्णालयात बेडची कमतरता जाणवत आहे. या परिस्थितीत 22 एप्रिलपासून लागू असलेले कडक निर्बंध आणखी 15 दिवस कायम ठेवण्यात यावेत, असे मत बहुतांशी मंत्र्यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडले होते. या बैठकीतच 15 दिवस निर्बंध कायम ठेवण्याबाबत सर्वांचे एकमत झाले होते. त्यानुसार आज 15 मेपर्यंत कडक निर्बंध वाढविण्याचे आदेश काढण्यात आले.
हे लक्षात ठेवा
- सर्वसामान्यांना मुंबई लोकल मेट्रो, मोनो प्रवास बंद. केवळ सरकारी कर्मचारी व आरोग्य कर्मचाऱयांनाच प्रवासाची परवानगी
- दुकाने, भाजीपाला, फळविव्रेते आदी केवळ सकाळी 7 ते 11 या वेळेतच मिळणार
- अत्यावश्यक कारणाशिवाय आंतरजिल्हा प्रवास बंद
- सर्वसामान्यांचा विनाकारण प्रवास बंद. अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहे.
- इतर सर्व कार्यालयांमध्ये 5 कर्मचारी किंवा 15 टक्के कर्मचार्यांनाच हजर राहता येणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचार्यांना काम करता येणार आहे.
- खासगी वाहतुकीसाठी ड्रायव्हरसह फक्त 50 टक्के प्रवाशांना परवानगी देण्यात आलीय, नियमांचं उल्लंघन झाल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
- खासगी वाहतुकीला केवळ अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी
- सार्वजनिक वाहतूक 50 टक्के क्षमतेनं चालणार, एसटी बस वाहतूक 50 टक्के क्षमतेनं सुरू राहणार
- स्थानकावर उतरल्यानंतर नागरिकांच्या हातावर होमक्वॉरंटाइनचा शिक्का बंधनकारक
- लग्नासाठी हॉलमध्ये 25 माणसांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आलीय, परंतु त्यासाठी फक्त 2 तासांची वेळमर्यादा दिलेली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंड
- कोरोना संक्रमित रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवणार

































































