
हिंदुस्थानात गेल्या 24 तासांत सर्वाधिक कोरोनाच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. एकाच दिवशी देशभरात एपूण 96 हजार 551 रुग्ण आढळून आले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्ण संख्या असल्याचे आरोग्य मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, देशात आता कोरोनाच्या एपूण रुग्णांचा आकडा हा 45 लाख 62 हजार 415 इतका नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, दिवसभरात 1 हजार 209 जणांचा मृत्यू झाला आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसर कोरोनामुळे आतापर्यंत 76 हजार 271 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एपूण 45 लाख रुग्णांपैकी देशभरात सध्याच्या घडीला फक्त 9 लाख 43 हजार 480 ऑक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 35 लाख 42 हजार 663 जण कोरोनामुक्त झाले असल्याचे आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77.65 टक्के इतके असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.
राज्यात 24 हजार 886 नवे कोरोना रुग्ण
राज्यात दिवसभरात 24 हजार 886 रुग्णांची नोंद झाली असून 14 हजार 308 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत 7 लाख 15 हजार 23 रुग्ण बरे झाले असून 2 लाख 71 हजार 566 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात आज 393 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 2.83 टक्के एवढा आहे.
मुंबईत कोरोनाचे 2172 नवे रुग्ण; 44 जणांचा मृत्यू
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून आज नव्या 2172 कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 44 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 165287 झाली आहे. तर मृतांचा आकडा 8064 झाला आहे. आज मृत झालेल्या 44 जणांमध्ये 30 पुरुष आणि 14 महिलांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 1132 जण कोरोनामुक्त झाले आहेत.























































