कोरोनाबाबतच्या खोट्या बातम्या दिल्याबद्दल पत्रकारांविरोधात गुन्हा दाखल

3514

कोरोनाचा फैलाव थांबावा, रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन हरतऱ्हेने प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांच्या आड येणाऱ्यांविरोधात पोलिसांनी आता कारवाई करायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी कोरोनासंदर्भात खोटी बातमी दिल्याने दोन पत्रकारांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय पोलिसांनी सोशल मीडियावर अफवा पसरवल्याबद्दल एकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोरोनापासून जीव वाचवायचा असेल तर घरीच थांबा, मीच आहे माझा रक्षक असं आवाहन प्रशासनामार्फत वारंवार करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता इतर सगळ्या गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत. संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र तरीही काही जण या बंधनांचं पालन न करता बिनधास्तपणे बाहेर फिरताना दिसतायत. देशाच्या विविध भागातून पोलिसांनी दंडुके मारून या विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना फटकावल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. रायगड जिल्ह्यात पोलिसांनी एक पाऊल पुढे जात नियम मोडणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आहे.

रायगड जिल्ह्यात जमावबंदीच्या आदेशांचे उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी माणगाव, खालापूर, पाली आणि अलिबाग इथे प्रत्येकी (1), दिघी सागरी (3), खोपोली आणि पेण प्रत्येकी (4) आणि नेरळमध्ये 3 जण असे मिळून एकूण 18 गुन्हे दाखल केले आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 (2008 चे सुधारणेसह) या अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये वृत्तवाहिनीवर खोटी बातमी दिल्याबाबत नेरळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या