
सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मिळून एकाच कुटुंबातील तब्बल 24 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 23 जण हे सांगली जिल्ह्यातले रहिवासी असून ते राहात असलेल्या या गावामध्ये हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. हे कुटुंब जिथे राहाते त्या घराशेजारचा पाचशे मीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. चिंतेत भर टाकणारी बाब ही आहे की या 24 जणांच्या संपर्कात आलेल्या 40 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
हे कुटुंब राहात असलेल्या गावामध्ये आणखी कुणाला बाधा होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. गावातील सगळ्या कुटुंबांना सांगण्यात आले आहे की अत्यावश्यक काम असेल तर घरातील फक्त एकाच व्यक्तीने घराबाहेर पडावे, अन्यथा सगळ्यांनी घरामध्येच थांबावे. घरातील फक्त एका व्यक्तीला बाहेर पडण्याची परवानगी असून हा व्यक्ती निश्चित करण्यात आला आहे. या व्यक्तीच्या हातावर शिक्का मारण्यात आला असून त्याच्याशिवाय इतर कोणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनीही इथल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी नियम अधिक कडक करण्यास सांगितले आहे.




























































