…तर कोरोना साथीच्या रोगाप्रमाणे पसरेल; नव्या संशोधनातील निष्कर्ष

कोरोनाच्या जागतिक संकटावर मात करण्यासाठी जगभरात अनेक देश लसीचे संशोधन करत आहेत. विकसीत करण्यात येणाऱ्या लसीच्या प्रभावाबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. त्यामुळे लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ती वितरीत करण्याच येणार आहे. या प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या संशोधनातून कोरोना हवामान बदलामुळे होणाऱ्या साथीच्या रोगाप्रमाणे पसरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे काही संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. तर कोरोना हा इतर साथीच्या आजाराप्रमाणे झाल्यावर त्याची तीव्रताही कमी होईल, असे काही संशोधकांचे मत आहे.

‘जर्नल फ्रंटियर इन पब्लिक हेल्थ’ मध्ये हे नवे संशोधन प्रसिद्ध करण्यात आले आहे. आगामी काळात जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात हर्ड इम्युनिटी विकसीत होईल, त्यानंतर इतर साथीच्या रोगांप्रमाणे कोरोना असेल, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. हवामात बदल झाल्यानंतर सर्दी, खोकला, ताप यासारखे आजार होतात. ते हवामानामुळे आणि साथीने पसरत जातात. त्याचप्रमाणे कोरोनादेखील एक साथीचा आजारात परीवर्तीत होईल, असे संशोधनात म्हटले आहे. मात्र, जनतेत मोठ्या प्रमाणात हर्ड इम्युनिटी विकसीत होत नाही किंवा कोरोनावर प्रभावी औषध येत नाही, तोपर्यंत कोरोनाचा प्रकोप सुरुच राहणार असल्याचा इशारा संशोधनात देण्यात आला आहे.

कोरोनाविरोधात जनतेची हर्ड इम्युनिटी विकसीत होत नाही किंवा यावर प्रभावी लस येत नाही, तोपर्यंत दरवर्षी ठराविक काळात कोरोनाचा जगातील विविध देशात उद्रेक होत राहील. त्यामुळे आगामी काळात सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे, असे अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ बैरुतचे संशोधक हसन जराकत यांनी सांगितले. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव असलेल्या देशातील नागरिकांना कोरोनासोबत जगण्याची सवय करावी लागणार आहे. जनतेमध्ये हर्ड इम्युनिटी विकसीत होईपर्यंत किंवा प्रभावी लस येईपर्यंत या महामारीचा अनेकदा उद्रेक होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे.

कोरोना साथीच्या आजारासारखा झाला तरी शीत आणि समशितोष्ण कटिबंधात याचा प्रभाव जास्त राहील, तर उष्ण कटिबंधात याचा फारसा प्रभाव दिसणार नाही. हवामान बदलानुसार याचेा प्रभाव कमी जास्त होण्याची शक्यता आहे. मात्र, कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असल्याने इतर साथीच्या रोगापेक्षा तो वेगाने पसरणार आहे. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी मोठ्या प्रमाणात जनतेची हर्ड इम्यनिटी विकसीत होणे किंवा प्रभावी लस येणे गरजेचे आहे. तोपर्यंत कोरोना रोखण्याबाबतच्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या