व्यायाम-योगासने-आहाराच्या त्रिसूत्रीने हृदयरोगाला ठेवा दूर…

हृदयाशी संबंधित आजार असल्यास कोरोनाच्या विषाणूच्या संक्रमणाचा धोका दुपटीने वाढतो. सध्याच्या काळात अनेकजण घरात बसूनच काम करीत असल्याने अनेकांचा दिनक्रम बदलला आहे. खाण्यापिण्याच्या सवयी आणि औषध घेण्याच्या वेळा बदलल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने खासकरून हृदयाचे विकार असलेल्यांनी घरातच चालण्याचा व्यायाम, योगासने आणि योग्य आहार विहाराच्या सवयी लावल्या तर ह्रदयरोगाला लांब ठेवता येईल, असा सल्ला प्रख्यात कार्डिअॅकसर्जन डॉ. पवन कुमार यांनी दिला आहे.

हृदयविकाराबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक ह्रदय दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जगात सुमारे 1 कोटी 75 लाख लोकांना ह्रदयविकाराने मृत्यू होतो. देशात होणाऱया मृत्यूपैकी सुमारे 33 टक्के मृत्यू हृदयरोगाने होतात. मागील काही काळात तरुण पिढीमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयी, जंक फूड, बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव यामुळे तरुण पिढीत हृदयविकाराचे प्रमाण वाढत आहे. सध्याच्या कोरोनाच्य काळात तर अनेक जण वर्प फ्रॉम होत करीत आहेत. व्यायामाच्या अभावामुळे आधीच हृदयविकाराचा धोका वाढत आहे त्यातच लॉकडाऊन आणि वर्प फ्रॉम होममुळे हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणाचे धोके वाढत आहेत.

या पार्श्वभूमीवर लीलावती रुग्णालयातील प्रख्यात कार्डिअॅकसर्जन डॉ. पवन कुमार यांनी हृदयविकाराला दूर ठेवण्यासाठी व्यायाम व सकस आहाराचा सल्ला दिला आहे. कारण कोरोनाच्या काळात हृदयविकारात गुंतागुंत वाढण्याचा धोका असतो. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे हृदयातील झडपामध्ये संसर्गाचा धोका असतो.

कोरोना लस व रेमडेसेवीर इंजेक्शन

सध्या कोरोनाच्या उपचारांमध्ये रेमडेसेवीर इंजेक्शनचा उपयोग होतो, पण ही इंजेक्शन उपचारात तेवढी प्रभावी नाही पण स्टिरॉईडसमुळे काही प्रमाणात रुग्णाला फायदा होत असल्याचे दिसून येते असे डॉ. पवन कुमार सांगतात. कोरोनाच्या लसीवर आपल्या देशासह संपूर्ण जगात संशोधन सुरू आहे, पण कोरोनाच्या विषाणूच्या स्वरूपात(म्युटेशन) बदल आहेत. उदाहरणार्थ गुजरातमधील विषाणू केरळमधील विषाणूपेक्षा वेगळा असू शकतो. त्याचा लसीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कोरोनावर मात केलेल्या लोकांमध्ये चार ते आठ आठवडय़ांनंतर अँटीबाँडीज कमी होताना दिसतात. त्यामुळे कोरोना पुन्हा होण्याची भीती असते पण एन्फ्ल्यूएन्झामध्ये अँडीबाँडीज एक वर्षापर्यंत शरीरात असतात याकडे डॉ. पवन कुमार यांनी लक्ष वेधले.

आपली प्रतिक्रिया द्या