कोरोनाचा असा करा सामना, योगगुरू रामदेव बाबांचा ‘रामबाण’ उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
baba-ramdev

चीनच्या वुहान शहरातून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत आहे. चीनमध्ये नवीन रुग्णांमध्ये घट होत असली तरी जगभरात तो अधिक वेगाने पसरत आहे. चीन आणि अन्य देशांमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत तीन हजार पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्थानमध्येही कोरोनाचा धोका वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे. जीवघेण्या कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी योगगुरू स्वामी बाबा रामदेव यांनी देशी पण रामबाण उपाय सांगितला आहे. योग आणि आयुर्वेदाद्वारे आपण कोरोनाचा सामना करू शकतो, असे योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.

बाबा रामदेव म्हणतात की, रोगप्रतिकारशक्ती जास्त असणारी लोकं कोरोनावर सहज विजय मिळवू शकतात, त्यामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योग महत्त्वाचा आहे. भस्त्रिका, कपालभाति, अनुलोम विलोम हे तीन प्राणायम नक्की करावे, असेही बाबा रामदेव म्हणाले. भस्त्रिका प्राणायाम तीन ते पाच मिनिटं, कपालभाति पाच मिनिटं आणि अनुलोम विलोम पाच मिनिटं करावे असेही बाबा रामदेव म्हणाले.

गुळवेल, तुळस आणि हळद या गोष्टींमुळेही तुम्ही कोरोनाचा सामना करू शकता. याद्वारे तुम्ही सर्दी, खोकला आणि यासारख्या व्हायरल लक्षणांवर विजय मिळवू शकता, असेही बाबा रामदेव म्हणाले. त्यासाठी गुळवेलाच्या तीन कांड्या घेऊन मिक्सरमधून त्याची भुकटी बनवावी. यानंतर दोन ग्लास पाण्यात ती भुकटी उकळावी आणि उकळून-उकळून एक ग्लास करावी. यात तुळस, अद्रक, काळी मिरी आणि हदळ टाकून याचा काढा घ्यावा, यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, असेही बाबा रामदेव यांनी सांगितले. गुळवेलमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. दोन ते तीन वेळा काढा घेतल्याने सर्दी, खोकला नाहिसा होतो. कोरोना होण्याआधी आणि झाल्यानंतरही तुम्ही हा काढा घेऊ शकता, असेही ते म्हणाले. तसेच आवळा आणि कोरफडीचा रस रोज सकाळी घेतल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. 50 वर्षात मला कधी सर्दी, खोकला आणि तापही आला नाही, असेही ते म्हणाले.

हिंदुस्थानलाही कोरोनाचा धोका, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28 वर

ते पुढे म्हणाले की, कोरोना व्हायरस डोळे आणि नाकाद्वारे आपल्या शरिरात प्रवेश करू शकतो. त्यामुळे कोणी कोरोनाबाधित असेल तर त्याने डोळे, नाक आणि चेहरा इतरांच्या संपर्कात येण्यापासून वाचवावा. यासाठी लांबून नमस्कार करा, गळाभेट घेऊ नका, हस्तांदोलन करू नका, चुंबन घेऊ नका, असेही बाबा रामदेव यांनी सांगितले. तसेच देशात राहणाऱ्या लोकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. फक्त विदेशातून कोरोनाग्रस्त देशातून जे लोक येत आहेत त्यांच्यापासून दूर रहा, असा सल्लाही त्यांनी दिला. तसेच योगाद्वारे चिकुन गुनिया, स्वाईन फ्लूवरही नियंत्रण मिळवता आल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाची दहशत वाढतीच! जगभरात 3000 बळी, 88 हजार लोकांना लागण

कोरोनाचा प्रभाव लहान मुलं, महिला आणि 50 ते 60 वर्षांवरील लोकांवर जास्त होत आहे. कारण त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. परंतु ज्यांची रोगप्रतिकारशक्ती जास्त आहे ते यावर विजय मिळवू शकता, असे बाबा रामदेव यांनी सांगितले. तसेच स्ट्रेस कमी करण्यासाठी भ्रामरी प्राणायाम करा. तसेच सूर्यनमस्कार यासह अन्य काही आसनही करू शकता. सुदृढ राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी योगा आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

कोरोना, नको ना! मग ‘हे’ करा ना Prevention to avoid coronavirus