स्वखर्चाने केली जंतुनाशक फवारणी; अंबरनाथ मधील 36 इमारती, 52 बंगले झाले चकाचक

940

‘गो कोरोना गो’ चा नारा देत अंबरनाथ मधील 36 इमारती व 52 बंगले चकाचक करण्यात आले आहेत. या सर्व वसाहतींमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात आली असून रहिवाशांनी स्वच्छतेचे कडक नियम पाळण्याचा निर्धार केला आहे. सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांवर देखील खबरदारीचा उपाय म्हणून हॅन्ड सेनेटायझर तसेच मास्कची व्यवस्था करण्यात आली असून या आदर्श उपक्रमाचा कित्ता अन्य गृहनिर्माणसंकुलांनी देखील गिरवण्याचा निर्णय घेतला आहे.

अंबरनाथ पूर्वेतील नवले नगर जवळ रॉयल पार्क संकूल असून त्याठिकाणी हजारो कुटुंबे राहत आहेत. याठिकाणी कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून स्थानिकांनी एकत्र येऊन सर्व इमारती स्वखर्चाने निर्जंतुक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सकाळी या मोहिमेला सुरुवात झाली. सोडियम हायपोक्लोराईट हे द्रव्य पाण्यामध्ये मिसळून विशिष्ट पंपाद्वारे त्याची फवारणी करण्यात आली . अंबरनाथ मधील सर्वात मोठ्या असलेल्या या गृहसंकुलामधील स्टेअरकेस, दरवाजे, लॉबी, प्रवेशद्वार ,बगीचे तसेच अन्य परिसराचे निर्जंतुकीकरण केले गेले. विशेष म्हणजे हा उपक्रम केवळ एका दिवसापुरता नव्हे तर आठवड्यातून दोन दिवस राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परदेशातून आलेल्यांवर वॉच

रॉयल पार्क संकुलात परदेशातून कुणी अलीकडच्या काळात आले आहे काय याचेदेखील सर्वेक्षण करण्यात आले असून कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रत्येक रहिवाशांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती रॉयल पार्क फेडरेशनचे चेअरमन व शिवसेना शाखाप्रमुख संजय सोनवणे यांनी दिली. या उपक्रमासाठी सेक्रेटरी रवींद्र हर्षे, सदस्य व्ही. बी. सिंग, मनोज नायर, राजेंद्र सोनवणे, दिनेश अहिरे ,अरविंद निकम, सचिन चव्हाण आदींनी सहकार्य केले.

आपली प्रतिक्रिया द्या