
आपण एका वळणावर उभे आहोत. कोणत्या दिशेला जायचे ते तुम्ही ठरवा. पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने जायचे नसेल तर वेळीच सावध व्हा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला केले. कोरोनापासून राज्यातील जनतेचा बचाव करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यापुढेही करीत राहू. पण जनतेने काळजी घ्यावी. विनाकारण घराबाहेर पडू नये. गर्दी टाळावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. अनेक जण मास्क न घालताच सध्या वावरत आहेत; पण कोरोना अद्याप गेलेला नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे अशी ढिलाई आपल्याला परवडणारी नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे बजावले.
आतापर्यंत जनतेकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, गेल्या आठ महिन्यांत अनेक सण येऊन गेले. मात्र आपण ते अतिशय साधेपणाने साजरे केले. गर्दी टाळली. त्यामुळेच कोरोना रुग्णांचा आकडाही कमी झाला. जनतेकडून मिळालेल्या या सहकार्याला तोड नाही आणि त्याबद्दल मी आभारी आहे. भविष्यात अशाच प्रकारचे सहकार्य मिळेल, अशी आशाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.
इतिहासाची पुनरावृत्ती करायचीय!
हुतात्मा दिनाचा उल्लेख करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, संयुक्त महाराष्ट्रासाठी त्यांनी संघर्ष केला नसता तर मुंबई आपल्याला मिळाली नसती. मुख्यमंत्र्यांनी या वेळी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचीही आठवण करून दिली. त्या हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण होतील. पोलीस आणि कमांडोंनी जिवाची बाजी लावून दहशतवाद्यांना ठेचून काढले. असा लढा आपण देतो तेव्हा नक्कीच यश मिळते. याच इतिहासाची पुनरावृत्ती आपल्याला कोरोनाच्या लढाईत करायची आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रत्येक गोष्टीसाठी कायद्याची गरज नाही
तुम्ही प्रत्येक सण साधेपणाने साजरा केलात. दसऱयाचे सोनेही साधेपणाने लुटले. दिवाळीत फटाके वाजवू नका, असे मी सांगितले. तुम्ही ऐकले आणि यंदा खूप कमी फटाके उडाले. आता रात्रीची संचारबंदी लागू करा, असे काही जण सांगतात. मात्र प्रत्येक गोष्टीसाठी कायद्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे खुली केली. पण या प्रार्थनास्थळांमध्ये गर्दी करू नका. कार्तिकी एकादशीही गर्दी न करता भक्तिभावाने साजरी करा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.
आपुलकीने चौकशी करा
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेला मिळालेल्या यशाचा उल्लेखही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी केला. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी आरोग्य यंत्रणेने अफाट काम केले. घरोघरी जाऊन माहिती घेण्यात आली. त्यामुळे राज्याच्या आरोग्याचा रोडमॅप तयार झाला. दर 10-15 दिवसांनी जाऊन जनतेची विचारपूस करा, असे मी आरोग्य यंत्रणेला सांगितले आहे. कारण ओलावा नसेल, जिव्हाळा नसेल तर ‘कुटुंब’ या संस्थेला, शब्दाला काहीच अर्थ राहणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
दुसरी लाट नव्हे, ती त्सुनामीच!
दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आली आहे. अहमदाबाद रात्रीची संचारबंदी लागू झाली आहे. अनेक पाश्चिमात्य देशांत तर लाट नव्हे, त्सुनामीच आली असावी, असे चित्र आहे. तशी परिस्थिती आपल्याकडे निर्माण होऊ नये यासाठी कोरोनाचे संकट गांभीर्याने घेण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
त्रिसूत्री पाळणे गरजेचे
कोरोनावर लस येणार हे खरे आहे; पण अद्याप ती आलेली नाही. डिसेंबरमध्ये येणार की जानेवारीत? समजा लस डिसेंबरमध्ये आली तर ती महाराष्ट्रातील साडेबारा कोटी जनतेला द्यावी लागेल. लसीचा पहिला डोस आणि नंतर बुस्टर डोस म्हणजे साडेबारा दुणे पंचवीस कोटी जनतेला ही लस द्यावी लागणार आहे. त्यामुळे पहिल्या डोसपासून शेवटच्या डोसपर्यंत किती काळ जाईल हे सांगता येणार नाही. लस कोणत्या स्वरूपात मिळणार, तिला कोणत्या तापमानात ठेवावे लागणार, ती कशी द्यायची, हे सगळे अजून अधांतरी आहे. म्हणूनच मास्क लावणे, हात धुणे आणि एकमेकांपासून अंतर पाळणे ही त्रिसूत्री आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
शाळा उघडण्याबाबत प्रश्नचिन्हच
अजूनही अनेक लोक बाहेर फिरताना मास्क लावत नाहीत. गर्दी होताना दिसत आहे. त्यात कोरोनामुळे अद्यापही शाळा उघडण्याबाबत प्रश्नचिन्हच आहे. त्या उघडायच्या आहेत, पण भीती आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मी नाराजही आहे
मुख्यमंत्र्यांनी नाराजीदेखील व्यक्त केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात केलेल्या विधानाचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, दिवाळीत लोकांनी इतकी गर्दी केली की त्या गर्दीत कोरोना मरून जातो की काय असे वाटू लागले, अशी भीती अजितदादांनी व्यक्त केली. अजितदादा तसे गमतीने म्हणाले. पण गर्दीत कोरोना मरत नाही तर तो वाढतो. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
…तर आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही
गेल्या आठ महिन्यांपासून डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस, महसूल कर्मचारी आपल्यासाठी राबत आहेत, झटत आहेत. आता त्यांच्यावर किती ताण आणायचा हा प्रश्न आहे आणि ते आपल्या हाती आहे. अनेक डॉक्टर्स आणि पोलिसांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. आता जर कोरोनाची लाट आली आणि वैद्यकीय कर्मचाऱयांची संख्या तोकडी पडली तर मग आपल्याला कोरोनापासून कोणीही वाचवू शकणार नाही, असा धोक्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
हे उघडा, ते उघडा… जबाबदारी घेता?
लॉकडाऊनच्या काळात बंद असलेल्या गोष्टी हळूहळू उघडण्यात येत आहेत. मात्र पुन्हा संसर्ग वाढू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. कारण मुख्यमंत्री या नात्याने जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे. हे उघडा, ते उघडा असे सांगणाऱयांवर नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र्ा सोडले. मी सर्व उघडतो, पण तुम्ही जबाबदारी घेताय का, असा सवालही त्यांनी केला.
पाश्चिमात्य देशांत दुसरी लाट नव्हे, त्सुनामीच आली आहे. तसे आपल्याकडे होऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे
अनेकजण मास्क लावत नाहीत. मात्र संकट अजून गेलेले नाही, त्यामुळे मास्क वापरा
गर्दीने कोरोना मरत नाही, तो वाढतो. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळा
कोरोनाची लाट आली आणि वैद्यकीय कर्मचाऱयांची संख्या
कमी पडली तर मग आपल्याला कोरोनापासून कोणीही वाचवू शकणार नाही
कोरोनामुळे अद्यापही शाळा उघडण्याबाबत प्रश्नचिन्हच आहे. त्या उघडायच्या आहेत, पण भीती आहे.

























































