राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा 17 वर पोहोचला; पुण्यात 1 व नागपुरात 2 रुग्ण आढळले

999

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. शुक्रवारी पुण्यामध्ये एक रुग्ण आणि नागपुरात 2 रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 17 वर पोहोचली आहे. यातील 10 रुग्ण पुण्यातील आहेत. पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर (Pune Divisional Commissioner Deepak Mhaisekar) यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे.

दुबईवरून आल्यानंतर पुण्यातील दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे सर्वात आधी स्पष्ट झाले होते. त्यानंतर या दाम्पत्याच्या मुलीला, दुबईवरून आल्यानंतर या दाम्पत्याला सोडण्यासाठी मुंबईवरून पुण्यापर्यंत आलेल्या ओला चालकालाही आणि सहप्रवाश्यालाही कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर पुण्यातील रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. शुक्रवारी आणखी एका रुग्ण पॉझिटीव्ह आढळला असून पुण्यातील रुग्णांची संख्या 10 वर पोहोचली आहे.

कोरोनामुळे शरिरामध्ये कसे बदल होत गेले, रुग्णाने सांगितला आपला अनुभव

शुक्रवारी दुपारच्या सुमारास पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यातील संशयित रुग्ण आणि कोरोनाबाधितांची माहिती दिली. अमेरिकेहून 1 मार्च रोजी पुण्यातील नागरिक परत आला होता. त्याची तपासणी 11 मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 9 वर गेली होती. शुक्रवारी यात आणखी एका रुग्णाची भर पडली. हा व्यक्ती देखील काही दिवसांपूर्वी अमेरिकेवरून आला आहे. सध्या या रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे दीपक म्हैसेकर म्हणाले. तसेच कोरोनाचे 311 संशयित देखरेखेखाली असून 700 जणांची तपासणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. संशयित रुग्णांनी घराबाहेर पडू नये. सोशल मीडियावर अफवा पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. राज्यात सध्या पुणे – 10, मुंबई – 3, नागपूर – 3, ठाणे – 1 रुग्ण आहे.

नागपुरात दोन रुग्ण आढळले
अमेरिकेहून आलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. याच दरम्यान शुक्रवारी त्याची पत्नी आणि आणखी एका नातेवाईकाचा रिपोर्टही पॉझिटीव्ह आल्याने नागपुरातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 3 झाली आहे. तसेच या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अन्य 13 जणांचीही तपासणी करण्यात आले असून तपासणीचे नमूने वेधशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.

CoronaVirus विरूद्धच्या लढ्यात हिंदुस्थानला मोठे यश, वाचा सविस्तर बातमी

आपली प्रतिक्रिया द्या