
विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराचे धान्य पुरवठा करणाऱ्या बीड येथील साई कंपनीकडून धान्याच्या मापात भ्रष्टाचार करण्यात येत असल्याची माहिती उघड झाली आहे. पन्नास किलोच्या धान्याच्या पोत्यामध्ये पंधरा किलो धान्य कमी म्हणजे पोत्यात फक्त 35 किलोच धान्य येत असल्याचा धक्कादायक प्रकार कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या निदर्शनास आला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांचे कुपोषण रोखण्यासाठी शालेय पोषण आहार देण्यात येतो. धाराशिव जिह्यातील शाळांना हा पोषण आहार पुरवठा करण्याचे कंत्राट बीड येथील साई ट्रेडिंग कंपनीला देण्यात आले आहे. सध्या दोन महिन्यांसाठीचा पोषण आहार जिल्हा परिषदेच्या शाळेत वाटप करण्याचे काम साईकडून करण्यात येत आहे. आज भाटशिरपुरा येथील जिल्हा परिषद शाळेत तांदुळ, मसूरडाळ, हरभराडाळ देण्यात येत होती.
परंतु शिक्षकांना वजनाबाबत संशय आल्याने त्यांनी तांदळाचे पन्नास किलोचे पोते वजन काटय़ावर मोजले असता ते चक्क 35 किलो भरले. मसूर डाळ, हरभरा डाळीचेही तेच कमी वजन भरले. यामुळे साई एजन्सीच्या माल देणाऱ्या कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यामुळे या सर्व प्रकाराची सखोल चौकशी होऊन शालेय पोषण आहाराचा पुरवठा करणाऱ्या साई ट्रेडिंग कंपनीवर तसेच या प्रकाराला खतपाणी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे.
पालकांनी केला निषेध …
मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे आणि कुपोषण थांबावे यासाठी शालेय पोषण आहाराचा पुरवठा करण्यात येतो, मात्र पन्नास किलोऐवजी पोत्यात फक्त पस्तीस किलो एवढे कमी धान्य पोत्यात भरले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना कमी पोषण आहार मिळतो. हा सर्व प्रकार येथील कंत्राटदाराने चालवला होता. हा प्रकार म्हणजे मढ्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी दिल्या आहेत.

























































