
सामना ऑनलाईन | नवी दिल्ली
हिंदुस्थानी अवकाश संशोधन केंद्राच्या म्हणजेच इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान मोहिमेची उलटगणना सुरू झाली आहे. या यानाचे श्रीहरीकोटा येथून 15 जुलैला प्रक्षेपण होणार आहे. चांद्रयान 2 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. या मोहिमेचे लाँचिंग 15 जुलैला पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरुन होईल. हे चंद्रयान 2, 6 किंवा 7 सप्टेंबरला चंद्रावर उतरण्याची शक्यता आहे.
चांद्रयान-2 चे प्रक्षेपण हिंदुस्थानच्या सर्वाधिक शक्तिशाली जीएसएलवी मार्क-III (GSLV MK-III) रॉकेटने होणार आहे. या रॉकेटला ‘बाहुबली’ नाव देण्यात आले आहे. ही इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहिम आहे. कारण चांद्रयान-2 चंद्रावरील दक्षिण ध्रुवावरील क्षेत्रात पोहचणारे आणि माहिती गोळा करणारे पहिले अंतराळ यान असेल. याआधी या भागात कोणतेही अंतराळ यान पोहचलेले नाही. दरम्यान, 10 वर्षांपूर्वी ऑक्टोबर 2008 मध्ये चांद्रयान-1 चे प्रक्षेपण झाले होते. यात एक ऑर्बिटर आणि इम्पॅक्टर होता, मात्र रोवर नव्हता. चंद्रयान-1 चंद्राच्या कक्षेत गेले, मात्र चंद्रावर उतरले नाही.
चांद्रयान-2 च्या लाँचिंगचे प्रात्यक्षिक यशस्वी झाले आहे. त्यामुळे ही मोहीम यशस्वी होण्याचा विश्वास इस्रोने व्यक्त केला आहे. चांद्रयान 2 मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर एक प्रज्ञान (रोव्हर) आणि विक्रम (लॅंडर) उतरवले जाईल. हे रोव्हरमध्ये अत्याधुनिक उपकरणे आहेत. त्यामुळे या मोहिमेत चंद्राची आतापर्यंत न मिळालेली माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या मोहिमेचा दुसरा भाग ऑर्बिटर असेल याचे वजन 3500 किलो आणि लांबी 2.5 मीटर आहे. याच्यासोबत 8 पेलोड असतील. ऑर्बिटर या पेलोडसह चंद्राच्या परिक्रमा करेल. अनेक परदेशी माध्यमांचेही या मोहिमेकडे लक्ष असून त्यांनी ही मोहिम आव्हानात्मक असल्याचे म्हटले आहे.
या मोहिमेची जबाबदारी दोन महिलांच्या हाती सोपवली आहे. या संपूर्ण मोहिमेच्या आखणीची जबाबदारी मुथैया वनिता यांच्याकडे देण्यात आली आहे. तर संपूर्ण मोहिमेच्या संचालक रितु करिधाल श्रीवास्तव आहेत. त्याच्यावर या मोहिमेची जबाबदारी आहे.




























































