जागतिक संगीत दिनानिमित्त जागतिक रेडिओ महोत्सव, सांस्कृतिक विभागाचा उपक्रम

जागतिक संगीत दिनाच्या औचित्याच्या निमित्ताने 21 जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025 आयोजित करण्यात आला आहे.

नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात 21 तारखेला दुपारी साडेचार वाजता हा सोहळा आयोजित  करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 12 रेडिओ पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रेडिओ महोत्सवामुळे मराठी भाषेच्या प्रचार व प्रसिद्धीस मोठय़ा प्रमाणात चालना मिळू शकेल. मराठीसाठी काही पुरस्कार राखीव असल्यामुळे मराठी कलाकार आणि मराठी भाषा यासाठी हा महोत्सव महत्त्वाचा असल्याचे आशीष शेलार म्हणाले.