जेवणाच्या डब्यासोबत औषधाचा डोस, सीआयएसएफची वाटचाल शून्य कोविड रुग्णाकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानतळाच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱया केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) च्या मुंबई विमानतळ युनिटची वाटचाल शून्य कोविड रुग्णाकडे सुरू झाली आहे. सेंट्रल टास्क फोर्सच्या माध्यमातून बॅरेक आणि कर्मचारी वसाहतीमध्ये कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून केलेले नियोजन, डय़ुटीवर असणाऱया जवानांना तीन लेयर मास्कच्या वापराच्या पद्धती आणि जवानांना जेवणाच्या डब्यासोबत रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याची औषधे दिल्याने त्याचा फायदा सीआयएसएफ विमानतळ युनिटला झाला. सध्या विमानतळ युनिटमध्ये फक्त नऊ जवान हे सौम्य लक्षणे असलेले आहेत.

मुंबई विमानतळावर दररोज 65 हजार प्रवासी देशाच्या विविध भागांतून मुंबईत येत असतात, तर 60 हजार प्रवासी हे मुंबईतून परराज्यात जात असतात. कोविड काळात जवानांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात आल्या. सीआयएसएफचे विमानतळ युनिटचे उपमहानिरीक्षक श्रीकांत किशोर यांनी युनिट कमांडंटची बैठक घेतली. बैठक घेऊन सुरक्षेच्या उपाय योजनांबाबत अॅक्शन प्लॅन तयार केला. विमानतळ युनिटमधील जवानांच्या कलिना, अंधेरी, अॅण्टॉप हिल, मरोळ, मालाड, कळंबोली येथे वसाहती आणि बॅरेक आहेत. दोन्ही मिळून सुमारे चार हजार जण राहतात. जवान आणि त्याच्या कुटुंबीयांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून आणि झाल्यास वेळेत उपचार मिळावे यासाठी सेंट्रल टास्क फोर्स तयार केले. तेथे 24 तास हेल्पलाइन सुरू केली. हेल्पलाइनवर जवानांच्या तक्रारी आणि अडचणी जाणून घेऊन त्या टास्क फोर्सकडे पाठवल्या जायच्या. जवानांच्या कुटुंबीयांना रोजच्या भाज्या, फळे आणि इतर वस्तू आणून देण्यासाठी वसाहतीमधील एकाची निवड केली गेली. कुटुंबीयांनी दिलेल्या ऑर्डरप्रमाणे ते साहित्य त्यांना पुरवले जात असल्याचे सहाय्यक कमांडंट सर्वना गौतम यांनी सांगितले. तसेच कोरोनाची बाधा झालेले जे जवान रुग्णालयात आहेत त्यांच्याशी उपमहानिरीक्षक श्रीकांत किशोर हे नियमित संपर्कात असायचे.

सीआयएसएफ हे शिस्तीचे दल आहे. कोविडला रोखण्यासाठी मुख्यालयातून येणाऱया सूचना अमलात आणून कोविड टास्क फोर्स तयार केले. उपचारापासून ते लसीकरणासाठी उपाययोजना केल्याने त्याचा फायदा आम्हाला झाला आहे. आमची वाटचाल शून्य कोविड रुग्णाकडे सुरू आहे. – श्रीकांत किशोर, उपमहानिरीक्षक, सीआयएसएफ, मुंबई विमानतळ युनिट

मास्क वापराचे केले नियोजन

डय़ुटीवर असणारे जवान हे प्रवाशांच्या संपर्कात येत असल्याने त्याच्यासाठी विशिष्ट पद्धतीचा मास्क तयार करण्याचे ठरले. दिल्लीच्या मेदांता रुग्णालयाच्या डॉ. सुशीला यांची यासाठी मदत घेण्यात आली. त्यानंतर तीन लेयर असलेल्या मास्कची निर्मिती केली गेली. जवानांना तीन मास्कचे नियोजन सांगण्यात आले. 12 तासांच्या डय़ुटीनंतर जवानांना 24 तास सुट्टी दिली जाते. तेव्हा जवानाने वापरलेले मास्क पुन्हा धुऊन न वापरता दुसरा मास्क वापरण्याच्या सूचना दिल्या. तर कुटुंबीयांसाठीदेखील विशेष मास्क तयार करण्यात आले.

  • एकूण जवानांपैकी 300 जणांना झाली होती कोरोनाची लागण
  • आतापर्यंत 90 टक्के जवानांचे झाले लसीकरण
  • 55 वर्षांवरील आणि गर्भवती महिलांना दिले वर्क फ्रॉम होम

पालिका डॉक्टरांची मदत ठरली महत्त्वाची

कोविड शून्याकडे वाटचाल करताना पालिकेच्या डॉक्टरांची मदत महत्त्वाची ठरली. सीआयएसएफने जवानांसाठी 500 बेड्सचे स्वतŠचे क्वारंटाइन सेंटर तयार केले. कोविडची ज्यांना बाधा झाली असल्यास त्यांना उपचार आणि लसीकरणासाठी पालिकेचे डॉ. राजेश ढेरे, डॉ. वर्षा पालकर, डॉ. केनरी मेहता, डॉ. बाळकृष्ण अडसूळ यांची मोलाची भूमिका होती.