कोव्हिशिल्डला युरोपियन संघाचा ‘ग्रीन पास’ मिळणार, परराष्ट्रमंत्र्यांच्या विनंतीवर सहकार्याचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिरम इन्स्टिटय़ूटच्या कोव्हिशिल्ड लसीचा डोस घेतलेल्या हिंदुस्थानींना लवकरच युरोपियन देशांमध्ये प्रवासाला मुभा मिळण्याची शक्यता आहे. कोव्हिशिल्ड लसीला ‘ग्रीन पास’ देण्याबाबत हिंदुस्थानचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी युरोपियन संघाचे वरिष्ठ पदाधिकारी जोसेफ बोरेल फोंटेल्स यांना मंगळवारी विनंती केली. त्यावर फोंटेल्स यांनी याबाबत सहकार्याचे आश्वासन दिले आहे.

कोव्हिशिल्डचा डोस घेतलेल्या हिंदुस्थानी नागरिकांना सध्या युरोपियन देशांमध्ये प्रवासाला मुभा नाही. त्यामुळे उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणारे विद्यार्थी आणि व्यावसायिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. याचा हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर ही समस्या सोडवण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी विनंती सिरम इन्स्टिटय़ूटचे सीईओ अदार पुनावाला यांनी सरकारला केली होती. त्यानंतर मंगळवारी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जी-20 विदेशी मंत्र्यांच्या बैठकीत युरोपियन संघाचे वरिष्ठ पदाधिकारी जोसेफ फोंटेल्स यांच्याशी याबाबत चर्चा केली.