
केंद्र सरकारने 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली. यासाठीची नोंदणी प्रक्रिया (रजिस्ट्रेशन) ‘कोविन ऍप’वर बुधवारी दुपारी 4 पासून सुरू झाले. परंतु अवघ्या काही मिनिटांतच ‘कोविन ऍप’ सर्व्हर कोसळले. ‘आरोग्य सेतू ऍप’चेही सर्व्हर डाऊन झाले. यामुळे देशभरात नेटकऱयांनी सोशल मिडियावर स्क्रीनशॉट शेअर करीत संताप व्यक्त केला.
लस घेण्यासाठी ‘कोविन ऍप’ किंवा ‘आरोग्य सेतू’वर नोंदणी बंधनकारक आहे. 28 एप्रिलपासून ही नोंदणी सुरू होईल, असे जाहीर करण्यात आले होते. अनेकांनी मंगळवारी मध्यरात्री बारानंतर रजिस्ट्रेशनचा प्रयत्न केला. त्यानंतर बुधवारी दुपारी चारनंतर हे रजिस्ट्रेशन सुरू होईल असे सांगण्यात आले. देशभरातील हजारो नागरिक विशेषतः तरुणांनी रजिस्ट्रेशनचा प्रयत्न सुरू केला; पण सर्व्हर डाऊन होते. यामुळे भ्रमनिरास झाला.
नेटकरी संतापले
- सर्व्हर काही मिनिटांतच डाऊन. हे काय सुरू आहे. आयटी सुपर पॉवर म्हणून घेणाऱयांना याची शरम वाटली पाहिजे. असा संताप एका नेटकऱयाने व्यक्त केला.
- ‘कोविन’ आणि ‘आरोग्य सेतू ऍप’ हे दोन्ही डाऊन आहेत. रजिस्ट्रेशनसाठीच एवढय़ा अडचणी असतील तर जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम हे आता विसरून जा, अशी प्रतिक्रिया ट्विटवर व्यक्त होत आहेत.
- लसीचा तुटवडा आणि नोंदणीसाठी अडचणी येत असतील तर कठीण आहे, असेही एका नेटकऱयाने म्हटले आहे.



























































