गब्बर इज बॅक;‘कांगारू’ क्रॅश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

द्वारकानाथ संझगिरी

हिंदुस्थानी संघाने ऑस्ट्रेलियाला 36 धावांनी हरवून या विश्वचषक स्पर्धेत आणखीन एक पाऊल पुढे टाकलंय. एकंदरीत ऑस्ट्रेलियन संघाचा दबदबा, त्यांची लढावू वृत्ती पाहता हे यतीचं पाऊल आहे. संपूर्ण ओव्हल निळं झालं होतं. जगातले सर्व रस्ते लंडनच्या ओव्हलकडे येऊन थांबतात, असं वाटत होतं. जगभरातले हिंदुस्थानी लंडनमध्ये आलेले आहेत. त्यांना प्रचंड आनंद आज हिंदुस्थानी संघाने दिला असेल.

दुखावलेल्या अंगठय़ाची पर्वा न करता धवनने एक सनसनाटी खेळी साकार केली. 109 चेंडुतलं हे शतक (117) हे इथे आलेल्या हिंदुस्थानींसाठी संस्मरणीय ठरेल. रोहितच्या गेल्या शतकाचा गंभीरपणे अभ्यास करून तो आल्यासारखी त्याने सुरुवात केली आणि एकदा खेळपट्टी त्याला वश झाल्यावर त्याने श्वास रोखून धरणाऱ्या फटक्यांचे प्रदर्शन मांडले. त्याने निर्माण केलेले वादळ हार्दिक पंडय़ाने अधिक तीक्र केले. हे सर्व विराट कोहली कौतुकाने समोरच्या टोकाकडून पाहत होता. त्याने 67 चेंडूंत 82 धावा करून हातभार लावला. त्याचा स्ट्राइक रेट 100पेक्षा जास्त असूनही विराट त्या वादळाचा भाग वाटला नाही. इतक्या शांतपणे त्याने ऑस्ट्रेलियन गोलंदाजी उद्ध्वस्त केली.

या पाटा खेळपट्टीवर बुमराह-भुवनेश्वरची गोलंदाजी महत्त्वाची ठरली. ऑस्ट्रेलियन फलंदजांची मधली फळी वणवा पेटवण्याची तयारी करताना ती आग विझवायचे काम त्या दोघांनी केले.नाणेफेकीने कोहलीला हात दिला. कोहलीने तो घट्ट धरला. पहिली फलंदाजी घ्यायचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला.

आपली सुरुवात संथ, पण शहाणी झाली. स्टार्कला स्पेल 3-0-8-0 असा धवन-रोहितने मिळवू दिला. ‘फाइव्ह कोर्स’ लंच घेताना पहिला हल्ला चिकनवर करायचा नसतो. सुरुवात सूपनेच करायची असते. स्टार्क आणि कमिन्स हे ऑस्ट्रेलियाचे प्रमुख गोलंदाज आहेत. पुढचे पदार्थ ताव मारण्यासारखेच आहेत. हिंदुस्थानी फलंदाजांनी नेमकं तेच केले. आज रोहितची बॅट किंचित आळसावलेली वाटली, पण गेल्या सामन्यातलं रोहितचं शहाणपण धवनने उसनं घेतलं. भाडय़ाने घेतलं की थेट विकत घेतलं हे यापुढे कळेल, पण आज सूर्य फक्त त्याच्यासाठी उगवला असल्याप्रमाणे त्याने फलंदाजी केली. हा धवन आपल्याला नवखा नाहीय, पण तो आपल्याला तसा सणासुदीला दिसतो. त्याला ऑस्ट्रेलियाला ‘घरचा अहेर’ द्यायला आवडतो. तो राहतो ऑस्ट्रेलियातच. त्याला ‘गब्बर’ म्हणतात. त्याने गब्बरचं क्रौर्य ऑस्ट्रेलियन गोलंदाजीला दाखवलं.

गौतम बुद्ध 49 दिवस बोधी वृक्षाखाली बसले आणि त्यांना ज्ञान प्राप्त झालं. साऊदम्प्टनच्या सामन्यानंतर शिखर धवन कुठल्या वृक्षाखाली बसला देव जाणे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध कशी खेळी उभारायला हवी याचं शहाणपण त्याने मिळवलं. तो आदी सेट झाला. त्याने स्टार्कचा पहिला स्पेल संपू दिला आणि मग बॅटची तलवार केली. त्याला खेळपट्टीचा आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या डावपेचाचाही फायदा झाला. खेळपट्टी तशी मंद आणि चेंडूचं उसळणंही शेपटीवर पाय पडलेल्या नागासारखे नव्हतं. त्यामुळे उसळत्या पांढऱ्या चेंडूवर तो पांढऱ्या घोडय़ावर  राजाने स्वार व्हावं तसा स्वार झाला. या विश्वचषकात उसळत्या चेंडूचा वापर वाढलाय. एकतर वेस्ट इंडीजचे गोलंदाज सध्या तो उत्तम वापरतात. पाकिस्तानला तर त्यांनी त्यावरच उद्ध्वस्त केला. दुसरं म्हणजे दोन उसळते चेंडू एका षटकात टाकता येतात. ते फलंदाजाने सोडले तर ते टिंब चेंडू (डॉट बॉल) होतात. हूक-पूल करण्याचा प्रयत्न केला तर फलंदाज सापडू शकतो. पण त्याला दुसरी बाजू आहे. त्याची दिशा चुकली तर फलंदाज तो धोपटू शकतात आणि चेंडूच्या वेगामुळे टायमिंग चुकलेला फटकाही षटकार देऊ शकतो. ऑस्ट्रेलियाच्या उसळत्या चेंडूंवर खेळपट्टीमुळे धवन अडचणीत आला नाही. उलट बाऊन्सचा उपयोग त्याने हूक, पूल, अप्पर कट मारण्यासाठी करून घेतला. त्याला कुठलाही फटका अप्राप्य आहे असं वाटत नव्हतं. ऑस्ट्रेलियाची फिरकी गोलंदाजी (झम्पा, मॅक्सवेल) त्याच्यासाठी ‘‘कडबा’’ होती. कर्णधाराच्या विनंतीवरून त्याने बॅटऐवजी नुसत्या स्टम्पनेही धावा केल्या असत्या. ‘‘गब्बर से सिर्फ गब्बरही बचा सकता है.’’ हा संवाद या खेळीत ‘गब्बर’ धवन फक्त बॅटने बोलला. त्याने ‘‘सुटायच’’ ठरवलं म्हणून तो बाद झाला.

त्याच्या आणि रोहित शर्माच्या भागीदारीने त्याने मोठय़ा धावसंख्येचा पाया घातला. मग कर्णधार कोहलीबरोबर त्याने 93 धावांची भागीदारी अवघ्या 89 चेंडूंत केली. कोहली सेट झाला आणि मग त्याच्या काही फटक्यांनी धवनच्या झगमगाटातही  आपली चमक दाखवली. धवन गेल्यावर हार्दिक पांडय़ाला पाठवणे हा मास्टर स्ट्रोक होता. 36.4 षटकांत 2 बाद 220 असताना आणि ऑस्टेलियन गोलंदाजी जवळपास गुलाम झाला असताना हार्दिक पांडय़ा हाच योग्य चॉइस होता. त्याला यष्टिरक्षक कॅरीने जे जीवदान दिले त्यामुळे कॅरी रात्री शांतपणे झोपणे कठीण आहे.  पुढे 27 चेंडूंत 48 धावा अक्षरशः ठोकून त्याने  कॅरीच्या उपकाराचे पांग फेडले. त्याने स्क्वेअर ड्राइव्ह मारले, पूल केले. थेट प्रेक्षक नावाच्या निळय़ा सागरात चेंडू फेकून दिले. दोनच गोष्टी जाणवल्या जेव्हा चेंडू गवतातून गेला तेव्हा गवत भाजलं, चेंडू वरून गेला तेव्हा हवा शहारली. अर्धशतकाच्या उंबरठय़ावर त्याचं बाद होणं त्याच्या पूर्वीच्या लौकिकाला साजेसं होतं, पण तोपर्यंत त्याची भूमिका त्याने नुसती निभावली नव्हती.  तिला ऑस्करचे नामांकन मिळायला हरकत नव्हते.

एका बाजूला कर्णधार कोहली 108 च्या स्ट्राइक रेटने धावा करत होता. धवन-पांडय़ाच्या वादळात त्याचा संयमित वादळ जाणवलं नाही. कोहलीने स्टार्कला मारलेले दोन षटकार एक डीपमिडविकेट आणि एक्स्ट्रा कव्हरवर हे स्टार्कला बॉस कोण आहे? हे दाखवायचा संयमित प्रयत्न होता. धोनी आल्यावर प्रेस बॉक्समध्ये काही भुवया उंचवल्या, पण धोनीने जो स्ट्रोक स्टार्कला मारला त्याने भुवया उंचावलेल्याच राहिल्या. पण स्टार्कही तो लवकर विसरणार नाही. स्टार्कने त्याच्या शेवटच्या स्पेलमध्ये जो मार खाल्ला तो अभूतपूर्व होता. पहिल्या तीन षटकांत फक्त आठ धावा देणारा स्टार्क 10-0-74-1 असे केविलवाणं गोलंदाजीचं पृथक्करण घेऊन परतला. बाऊन्सर, स्लोअर  वन, यॉर्कर्स हे सर्व चेंडू हिंदुस्थानी फलंदाजांसमोर निप्रभ ठरले. ऑस्ट्रेलियन गोलंदाजीने गुडघे टेकून हिंदुस्थानी फलंदाजीला ‘‘जोहार मायबाप’’ म्हटलं.

ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सुरुवातीच्या बुमरा-भुवनेश्वरने बेडय़ा ठोकल्या. पण पंडय़ाने पहिल्या दोन षटकांत त्यांना पॅरोलवर सोडले. वॉर्नर नक्कीच मैदानच्या भाषेत सांगायचं तर दही खाऊन आला होता. चेंडू स्टम्पला लागला; पण बेल्स पडल्या नाहीत. हे या विश्वचषकात चौथ्यांदा घडलं. इथे इंग्लंडमध्ये त्या बेल्सबद्दल खूप चर्चा आहे. इंग्लंडमध्ये दोन प्रकारच्या बेल्स असतात. काही वजनाने हलक्या तर काही थोडय़ा वजनदार. कारण जेव्हा वारा जोरात वाहतो तेव्हा वजनदार वापरतात. या बेल्सचे वजन या दोहोंमधले आहे. याचा अर्थ दिवा पेटावा म्हणून या तंत्रज्ञानासाठी त्या वजनदार केलेल्या नाहीत. वॉर्नर नशीबवान होता असे म्हणूया. तेवढा फिंच नशीबवान नव्हता. केदार जाधवच्या थ्रोने तो बाद झाला. इथे इंग्लंडमध्ये असे संशोधन आलंय की थ्रो ताशी 80 मैलापेक्षा अधिक वेगवान असेल आणि तो थेट स्टम्पवर गेला तर धाव घेणारा फलंदाज बाद होऊ शकतो. त्यामुळे अशा थ्रोचा सराव अलीकडे केला जातोय. परवा इंग्लंडच्या बेअरस्ट्रॉने ही गोष्ट स्पष्ट केली. केदारचा थ्रो हा त्या कॅटॅगरीतला असावा. खेळपट्टी गोलंदाजीला अजिबात पाठिंबा देत नव्हती. हिंदुस्थानच्या डावात मॅक्सवेलचे काही चेंडू वळल्यावर थोडी आशा निर्माण झाली होती. पण कुलदीप निप्रभ वाटला. पांडय़ाने उसळत्या चेंडूचा जरा अधिक वापर केला. एक-दोन वेळा त्याने फलंदाजांच्या कानात शीळ घातली. पण पूल आणि कटवर धावाही दिल्या. वॉर्नर-फिंच जोडीने आणि स्मिथ-ख्वाजाने इथल्या पेक्षकांची धडधड वाढवली. टेंशनच्या निमित्ताने प्रेक्षकांकडून बिअरचे दोन ग्लास जास्त रिचवले गेले; पण ऑस्ट्रेलियन संघ धोक्याची पातळी ओलांडतोय असं मला कधीच वाटलं नाही. वर्ल्ड कपमध्ये एका टप्प्यानंतर षटकांमागे 10-11 धावांनी पाठलाग करणे ही सोपी गोष्ट नाही. कारण त्यासाठी षटकांत किमान एक-दोन वेळा जोखीम घ्यावी लागते. बुमरा-भुवनेश्वर हे कुणीही उठावे जोखीम घ्यावी, कुलूप फोडावं, धावा लुटाव्यात असे गोलंदाज नाहीतच मुळी. त्यांनी फटक्यांचे घाव सहन केले; पण योग्य वेळी बेक थ्रू मिळवून दिले. धावांसाठी इप्रोवायझेशन करणाऱ्या ख्वाजाचा त्रिफळा बुमराने उडवला. एका षटकात मोठे दान घेतलेल्या भुवनेश्वरने मग स्मिथचं छोटंसं राज्य खालसा केलं. स्टॉयनिसला फक्त यस सर म्हणायला वेळ मिळाला आणि कॅप जिंकण्याची मॅक्सवेलने दिलेली धमकी एकेकाळी बुद्धिबळाचा चॅम्पियन व्हायचं स्वप्न पाहणाऱ्या चहलने खरी होऊ दिली नाही. शेवटच्या षटकात बुमराकडून विकेटशिवाय धावा वसूल करणे म्हणजे पठाणाकडून व्याजाशिवाय कर्ज घेण्यासारखे आहे हे त्याने पुन्हा सिद्ध केले. ऑस्ट्रेलियाने 300चा पल्ला ओलांडला; पण 350पर्यंत जाताना श्वास कोंडला आणि हिंदुस्थानी संघाने निःश्वास सोडला.