
सत्ताधारी भाजपशी संबंधित नेते व कार्यकर्त्यांची गुंडगिरी देशभरात वाढली आहे. उत्तर प्रदेशातील विलासपूर येथे एका भाजप पदाधिकाऱ्याने क्षुल्लक कारणावरून एका महिलेसह तिच्या मुलाला चपलेने मारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर देशभरात संताप व्यक्त होत आहे.
दादागिरी आणि मारहाण करणाऱ्या या भाजप पदाधिकाऱ्याचे नाव आतिक पठाण आहे. तो भाजपचा विलासपूरमधील कासनाचा मंडल मंत्री आहे. विजेच्या तारेवरून दोन महिलांमध्ये झालेल्या वादात आतिक पठाण याने आधी हस्तक्षेप केला. नंतर काही कळण्याच्या आत तो एका तरुणावर धावून गेला व त्याला चपलेने मारू लागला. तरुणाला वाचवण्यासाठी त्याची आई मध्ये पडली असता आतिकने तिलाही चपलेने मारहाण केली. तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आतिक पठाणला अटक केली.