दगडाने डोके ठेचून ठार मारणारा माथेफिरू गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गिरगाव चौपाटीजवळ एका व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या करणारा माथेफिरू आरोपी अखेर सापडला. आरोपी तरुण हा भंगार वेचणारा असून त्याने अशाप्रकारे गोव्यातदेखील एकाची हत्या केल्याचे समोर येत आहे.

गजानन पवार (55) यांची 21 जूनला रात्री अज्ञात इसमाने गिरगाव चौपाटीजवळ दगडाने डोके ठेचून हत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर उपायुक्त नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. मार्ग पोलिसांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासल्यानंतर एका व्यक्तीचा वावर संशयास्पद आढळला. त्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. आरोपी वांद्रे पश्चिमेकडील परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हिल रोड व परिसरात शोधाशोध सुरू केली.  हिल रोड येथील बालाजी हॉटेल येथे मोफत जेवण वाटप केले जाते व तेथे कचरा वेचणारे येतात. हे समजताच पोलिसांनी तेथे धाव घेऊन सूरज यादव (23) या भंगार वेचणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्हा केल्याचे सांगितले. पवार यांची क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यानंतर डोक्यात दगड मारून हत्या केल्याचे त्याने सांगितले.