रोनाल्डोचा रियल माद्रिदला रामराम, युवेंट्ससोबत विक्रमी करार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । माद्रिद

पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर आणि गेल्या ९ वर्षापासून रियाल माद्रिदला विजयाची वाट दाखवणारा ख्रिस्तियानो रोनाल्डो याने नव्या क्लबसोबत करार केला आहे. विश्वचषकामध्ये खराब कामगिरीमुळे रोनाल्डो माद्रिदला रामराम करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या अखेर मंगळवारी रोनाल्डोने इटालियन फुटबॉल क्लब युव्हेंट्ससोबत २२० मिलियन युरोचा (१७७४ कोटी) करार केला आहे. रियाल माद्रिद क्लबने त्यांच्या अधिकृत साईटवर या बाबतची घोषणा केली आहे.

२००८ साली विक्रमी करारावर मँचेस्टर युनायटेडकडून रियाल माद्रिदमध्ये रोनाल्डोने एण्ट्री केली होती. सर्व प्रकारच्या स्पर्धांमध्ये मिळून रोनाल्डोने रियाल माद्रिदकडून दे दणादण ४५१ गोल केले. या दरम्यान, त्याने दोन ला लीगा तसेच चार चॅम्पियन्स लीगच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. परंतु अखेर रोनाल्डो व रियाल माद्रिद यांच्या घवघवीत यशाची ही जोडगोळी तुटली आहे. रोनाल्डोने क्लबला रामराम केल्यानंतर क्लबकडून जारी करण्यात आलेल्या एका वक्तव्यामध्ये, रियाल माद्रिदच्या येणाऱ्या पिढीसाठी ख्रिस्टियानो रोनाल्डो प्रेरणास्त्रोत राहिल असे म्हटले आहे. तसेच रियाल माद्रिद नेहमीच रोनाल्डोचे एक घर राहील असेही क्लबने म्हटले आहे.

रियाल माद्रिदसोबतचा नऊ वर्ष विविध स्पर्धा गाजवणाऱ्या रोनाल्डोने एक भावनिक पत्र लिहून क्लबचा निरोप केला आहे. आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचे क्षण या क्लबसोबत घालवल्याचे रोनाल्डोने सांगितले. तसेच, ‘आयुष्यात नवा अध्यायाला सुरूवात करण्याची हिच योग्य वेळ आहे. त्यामुळेच माद्रिद क्लबने हा निर्णय स्वीकारावा अशी विनंती मी त्यांना केली होती. या निर्णयाने चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न आले असतील, कृपया मला समजून घ्या’, असे त्याने आपल्या पत्रात नमूद केले आहे.