Manipur Violence – इंफाळमध्ये मंत्र्याच्या घराबाहेर बॉम्बस्फोट, सीआरपीएफ जवानासह महिला जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो प्रातिनिधिक

मणिपूरचे ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री खेमचंद युमनम यांच्या घराबाहेर बॉम्बस्फोट झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. या स्फोटात  सीआरपीए जवानासह एक जण जखमी झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंफाळ जिल्ह्यातील युमनाम लेइकाई येथे शनिवारी रात्री साधारण साडेदहाच्या सुमारास हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे आमदार युमनाम खेमचंद यांच्या निवासस्थानाच्या बाहेर हा हल्ला झाला आहे.

अद्याप हा हल्ला कोणी केला हे कळलेले नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. मात्र या हल्ल्यात सीआरपीएफ जवानासह एक महिला जखमी झाली आहे. दिनेशचंद्र दास असे जखमी जवानाचे नाव असून तो पश्चिम बंगाल येथील आहे. सुरक्षा जवान खेमचंद यांच्या निवासस्थानी तैन्यात होता. त्याच्या हाताला जखम झाली आहे.