घातपातासाठी नक्षलवाद्याची नवी शक्कल, जंगलात स्फोटकांसह उभे केले डमी नक्षली

23

सामना ऑनलाईन । सुकमा

छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणांचा घात करण्यासाठी नक्षलवाद्यांनी लढवलेली नवी शक्कल सीआरपीएफ जवानांनी उधळून लावली आहे. हातात लाकडी शस्त्रे असलेली तीन बुजगावणी सुकमा जिल्ह्यातील चिंतागुफा जंगलात आढळली आहेत. या बुजगावण्यांखाली शक्तीशाली स्फोटके लपवून ठेवली होती. या स्फोटकांना धक्का लागताच भीषण स्फोट घडवून घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा कट सीआरपीएफ जवानांनी उधळला आहे.

सीआरपीएफच्या 150 बटालीयनला गुरुवारी चिंतागुफा जंगलात तीन शस्त्रधारी बुजगावणी आढळली. सुरुवातीला नक्षलवादी लपल्याचा संशय जवानांना आला. मात्र कुठलीच हालचाल होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर बुजगावणे असल्याचे सिद्ध झाले. जवानांनी सावधपणे तपासणी केली असता बुजगावण्याच्या बाजूलाच स्फोटके लपवल्याचे आढळले. सीआरपीएफने ही स्फोटके जप्त करून ती नष्ट केली आहेत. नक्षलवाद्यानी सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी आणि घातपात घडवण्यासाठी अशाप्रकारची शक्कल पहिल्यांदाच लढवल्याचे सीआरपीएफच्या 150 बटालीयनचे कमांडंर डी सिंह यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या