धोनीच्या चेन्नई संघाला धक्का, एका सदस्याला कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएल सुरू होण्याआधी अजून वेळ असला तरी महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला शनिवारी मोठा धक्का बसला आहे. या संघातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाच्या वेबसाइटवरून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग्जमधील सर्व खेळाडूंसह सपोर्ट स्टाफलाही क्वारंटाइन व्हावे लागले आहे.

चेन्नई सुपरकिंग्जमधील कोणत्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे याबाबत अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही. पण दुबईमध्ये पाऊल ठेवल्यानंतरच त्या व्यक्तीला कोरोना झाल्याची बातमी पुढे येत आहे. चेन्नई सुपरकिंग्जचा संघ 21 ऑगस्टला दुबईला पोहोचला होता. शुक्रवारी त्यांचा क्वारंटाइन कालावधीही पूर्ण झाला होता. पण आता आणखी एक आठवडय़ाने हा कालावधी वाढवण्यात येणार आहे.

चौथीही टेस्ट केली
यूएईमध्ये पोहोचल्यानंतर सहभागी संघांतील सर्वांनाच सरावाला सुरुवात करण्याआधी तीन वेळा कोरोना चाचणी करावी लागणार आहे. बीसीसीआयकडून हा नियम तयार करण्यात आला आहे. पण चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एकाला कोरोनाची लागण झाल्यामुळे आता या संघातील सर्वांचीच चौथीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्याचा रिपोर्ट येणे बाकी आहे.