दादा कोंडके आजही तरुणांसाठी प्रेरणास्थान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
अभिनयाचा हुकमी एक्का, विनोदाचा बादशाह, गीतकार, लेखक, अभिनेता, चित्रपट-निर्माता अशा सर्वच क्षेत्रात दादा कोंडके यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले.

सामना प्रतिनिधी । पुणे

दादा कोंडके यांनी सर्वसामान्य माणसाचे आपल्या कलेतून मनोरंजन केले नाही, तर त्यांचे प्रबोधनही केले. प्रेक्षक आजही त्यांना मानतात. सर्वसामान्य रसिकांमुळे दादा कोंडके आजही लोकांमध्ये जिवंत आहेत. ते आजही तरुणांसाठी प्रेरणास्थान आहेत, अशी भावना कॅप्टन अप्पासाहेब खांबाळे यांनी व्यक्त केले.

दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनतर्फे दादा कोंडके यांच्या २१व्या स्मृतिदिन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी गोखलेनगर परिसरातील कष्टकरी नागरिकांना अवघ्या दहा रुपयांत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणारे डॉ. शशिकांत चव्हाण आणि एकपात्री कलाकार संतोष चोरडिया यांचा सन्मान करण्यात आला, तर पंडित राम मराठे स्मृती संगीत स्पर्धेत तबलावादनात प्रथम क्रमांक पटकाविणारा युवा कलाकार महेश संजय मरळ आणि ‘पुळका’ या कादंबरीचे लेखक सुरेश पाटोळे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘अण्णाभाऊ साठे पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनचे प्रमुख विश्वस्त मनोहर कोलते, सचिव राजेंद्र भवाळकर, विश्वस्त परशुराम शेलार, खजिनदार विक्रम जाधव, वामन जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

संतोष चोरडिया म्हणाले, कलेच्या माध्यमातून समाजसेवेची मोठी संधी कलाकारांना उपलब्ध होत असते. सामाजिक उत्तरदायित्वातून उतराई होण्यासाठी कला हे एक चांगले माध्यम आमच्याजवळ असल्याचा अभिमान वाटतो. बाबा आमटेंचा आश्रम हे माझ्या सामाजिक जाणिवेचे ऊर्जाकेंद्र आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दादा कोंडके मेमोरिअल फाऊंडेशनचे प्रमुख विश्वस्त मनोहर कोलते यांनी केले. सचिव राजेंद्र भवाळकर यांनी दादा कोंडके यांच्या आठवणींना उजाळा दिला. विश्वस्त परशुराम शेलार यांनी आभार मानले.