दापोली मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला, विरोधकांना नेस्तनाबूत करा! – कदम

1321

दापोली मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तब्बल 25 वर्ष दापोली मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व होते. तेच वर्चस्व आपल्याला पुन्हा प्रस्तापित करायचे आहे, त्यामुळे साऱ्यांनी पेटून उठा. शिवसेनेशी गद्दारी करून शिवसेनेच्याच विरोधात दंड थोपटणाऱ्याना आपली जागा दाखवून द्या, असे आवाहन राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांनी केले. महायुतीचे दापोली मतदार संघाचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचारासाठी पर्यावरण मंत्र्यांनी असतान जिल्हा परिषद गटाचा झंझावाती दौरा केला. या दरम्यान तळे येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते.

शिवसेना उमेदवारांची संपूर्ण यादी, वाचा कोणत्या मतदारसंघात कोण आहे उमेदवार…

शिवसैनिकांना संबोधतांना ते म्हणाले, खेड तालुक्यातील असतान जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत मावळ्यांचा गट आहे. हा गट प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला आहे. यावेळी हा गटातील मतदार शिवसेनेलाच भरभरून मतदान करतील याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही.

विधानसभा२०१९ – महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, वाचा सविस्तर…

1990 साली मी खेड विधानसभा मतदार संघाचा आमदार झालो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या संधीचे सोने करत मी शिवसेनेच्या माध्यमातून अनेक पदे उपभोगली. आता संघटनेने माझ्यावर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी सोपवली आहे, मात्र मी ज्या मतदारांनी मला मोठं केले त्या खेडच्या जनतेला मी विसरणे शक्यच नाही. तुमच्यासाठी, तुमच्या विकासासाठी मी माझा मुलगा योगेश कदम याला तुम्हाला दिला आहे. दापोली मतदार संघातून तो विधान सभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे. दापोली मतदार संघावर आपल्याला भगवा फडकावून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांचे स्वप्न साकार करायचे आहे. त्यामुळे तुम्ही सारे सज्ज व्हा, विरोधकांना नेस्तनाबूत करून दापोली मतदार संघावर शिवसेनेचा भगवा फडकवा असे आवाहन रामदास कदम यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान मतदारांना केले.

आपली प्रतिक्रिया द्या