मजबूत पौष्टिक दारासिंग थाळी

आसावरी जोशी,ajasavari@gmail.com

 दमदार, प्रचंड दारासिंग थाळी… रुस्तम-ए-हिंद दारासिंग यांच्या आठवणीतून या थाळीची निर्मिती झाली आहे. एकावेळी ४-५ जण आरामात या थाळीत जेवू शकतात…

कुस्ती… अर्थात आपली मल्लविद्या… पुराणकालीन, शिवकालीन लोकप्रिय खेळ… कुस्तीत लाल मातीतली रग जशी महत्त्वाची तितकाच प्रचंड थकवणारा… दमवणारा सरावही महत्त्वाचा… आणि या सगळय़ाला पूरक आणि आत्यंतिक महत्त्वाचा म्हणजे आहार. मल्लाचा आहार, खुराक मजबूत, तत्काळ ऊर्जा देणारा, स्नायूंची ताकद वाढवणारा.  काय नसते या आहारात… प्राचीन मल्लविद्येत मल्लांसाठी वेगळी आचारसंहिता आहे. त्यात आहाराची तत्त्वे आहेत.

मल्लाने साखर मिसळून दूध प्यावे.

भाजीपाला, फळे, दही, तूप यांचे सेवन करणे.

रसाळ द्राक्षे खावीत.

मांसाहार वर्ज्य करावा.

नैसर्गिक आहारावर भर देणारी मल्लांची एक वेगळी मांदियाळी आपल्याकडे होती.

dara-singh-3

यामध्ये ‘रुस्तम-ए-हिंद’ दारासिंग यांचे नाव फार वर आणि आदराने घ्यावे लागेल. पंजाबातील शेकडो एकर वडिलोपार्जित शेतीत प्रचंड अंगमेहनत करून छोटय़ा दाराचे शरीरही पीळदार झाले होते. अंगात भरपूर ताकद होती आणि काम करण्याचा जबरदस्त आवाका. आपले नशीब अजमावण्यासाठी दारासिंगने सिंगापूर गाठले आणि शरीरयष्टीच्या जोरावर पहारेकऱयाची नोकरी मिळवली. रात्री पहारा द्यायचा आणि दिवसा कुस्तीच्या आणि गामा पैलवानाच्या गोष्टी ऐकायच्या. दाराची कुस्तीची आवड पाहून त्याला कुस्ती का करत नाही म्हणून एकाने विचारले. इतक्या मोठय़ा वयात कुस्ती कशी शिकणार आणि लागणाऱया खुराकाचे कसे जमवायचे… हा प्रश्न त्याच्यापुढे होता. पण तरीही त्या वस्तादाने दाराला कुस्तीच्या आखाडय़ात उतरवले. वयाच्या १९ व्या वर्षी दारासिंगने एका चिनी पेहलवानाला चीतपट केले. या कुस्तीने त्याला पैसे मिळवून दिले. आता खुराकाची सोय झाली होती. यानंतर अनेक छोटय़ा-मोठय़ा कुस्त्या जिंकत दारासिंग मुंबईत आले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा किंगकाँग आपल्या क्रौर्यासाठी आणि पाशवी शक्तीसाठी प्रसिद्ध होता. दारासिंगांनी त्याच्याशी जबरदस्त कुस्ती खेळून त्याला रिंगणाबाहेर फेकून दिले. आपल्या संपूर्ण कारकीर्दीत एकही कुस्ती न हरण्याचा विक्रम दारासिंगांच्या नावावर आहे.

मुंबईतील मिनी पंजाब रेस्टॉरंट… पारंपरिक पंजाबी खाद्यपदार्थ तसे पाहता केवळ मुंबई, महाराष्ट्रापुरतेच, नव्हे तर संपूर्ण जगात पोहोचलेले आणि लोकप्रिय ठरलेले… मुंबईतील लहानमोठय़ा प्रत्येक उपाहारगृहातील मेन्यूकार्डवर पंजाबी पदार्थ जागा मिळवून दाटीवाटीने बसलेले… पण तरीही ‘मिनी पंजाब’चे कौतुक अशासाठी की ‘रुस्तम-ए-हिंद’ दारासिंग यांच्या आठवणींतून आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांनी एक वेगळीच संकल्पना निर्माण केली आहे.

भलीमोठी दारासिंग थाळी. सध्या ही मुंबईत खूप लोकप्रिय होते आहे. ही थाळी आपल्यापर्यंत घेऊन येण्यासाठीच दोन वेटर्स लागतात. एक थाळी संपूर्ण मेज व्यापून टाकते. उत्तरेचा स्वाद, खाद्यरसिकांना काहीतरी नवे देण्याची चाह आणि दारासिंगांची आठवण यातून या आगळय़ावेगळय़ा थाळीची निर्मिती करण्यात आली आहे. या थाळीचे संयोजक निशांत चावला सांगतात की, आमच्याकडे येणाऱया तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाला काही ना काही आवडेल असे या थाळीत आहे.

पूर्वी आपल्या घरात सगळेजण एकत्र जेवायला बसायचे. आता प्रत्येकवेळी ते शक्य होतेच असे नाही. मग हे एकत्र येणं, जेवणं या थाळीच्या रूपाने खाद्यरसिकांना मिळते आहे. यातून एकमेकांच्या आवडीनिवडीशी जुळवून घेत, आनंदात गप्पा मारत एकत्र जेवणे हा यामागचा हेतू आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही खाद्यप्रकार विपुल प्रमाणात या थाळीत आहेत. भरपूर स्टार्टर्स, फरसाण, चार प्रकारची स्वागतपेये, पाणीपुरी, नॉनव्हेज प्रकारातील १७ प्रकार, भाताचे चार प्रकार, ३-४ प्रकारच्या रोटी आणि सगळय़ावर कडी म्हणजे सहा प्रकारची पक्वान्नं. या एका थाळीत एका वेळेस चार माणसं सहज जेवू शकतात. ही संपूर्ण थाळी जर एकटय़ा माणसाने संपवली तर ती त्याला विनामूल्य देण्याचीही सोय आहे, पण अजून तरी असा कोणीही ही थाळी संपवू शकलेला नाही.

मला या थाळीचे जाणवलेले वैशिष्टय़ म्हणजे, यातील प्रत्येक पदार्थ पौष्टिक आणि सकस आहे. प्रथिने, कर्बोदके, स्निग्धांश, शर्करायुक्त अशी परिपूर्ण आहार घटकांनी ही युक्त थाळी आहे. अगदी दारासिंगांच्या पोषक आहाराशी मिळतीजुळती. आजच्या पैलवानांच्या पार्श्वभूमीवर दारासिंगांचा आहार हा अत्यंत नैसर्गिक आणि पोषक होता.

दिवसाची सुरुवात दारासिंग १०० ग्रॅम बदाम, मुरांबा आणि तुपाने करायचे. शिवाय रोज चांदीचे दहा वर्ख आहारात समाविष्ट असायचे. २ लिटर दूध, अर्धा किलो चिकनच्या बरोबरीने ७-८ पोळय़ांचाही समावेश होता… आणि व्यायामानंतर थंडाई त्यांनी कधी चुकविली नाही.

दारासिंग यांच्या या आहाराचे प्रतिबिंब मला या थाळीत दिसले. दोन, सव्वादोन हजारांत एवढी मोठी थाळी सहज खिशाला परवडणारी आहे. तेव्हा आता वाट कशाची पाहताय… चला पवईला ‘मिनी पंजाब’मध्ये दारासिंग थाळी खायला…