
आपल्या 86 वर्षांच्या सासूची तव्याने जबर मारहाण करून हत्या करणाऱ्या सुनेला तब्बल 10 दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे. शर्मिष्ठा सोम असं या आरोपी महिलेचं नाव आहे. आपली सासू हाशि सोम हिची अत्यंत क्रूरतेने हत्या केल्याचा आरोप शर्मिष्ठावर आहे.
ही घटना दिल्लीतील नेब सराय परिसरात घडली आहे. 28 एप्रिल रोजी नेब सराय परिसरातून दिल्ली पोलिसांना फोन आला होता. फोन करणाऱ्याने त्याच्या मित्राची आई घरात पडल्याने तिला खूप रक्तस्राव होत असल्याचं म्हटलं होतं. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना एका 86 वर्षांच्या वृद्धेविषयी माहिती कळली. ही महिला येथे एका स्वतंत्र घरात राहत होती. तिच्या समोरच्या घरात तिचा मुलगा सूरजीत आणि सून शर्मिष्ठा राहतात.
हाशि सोम हिच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर अनेक ठिकाणी जखमा दिसून येत होत्या. सूरजीत याच्या म्हणण्यानुसार, हाशि सोम हिला आर्थरायटिस (अस्थिभंग)चा त्रास होता. ऑक्टोबर 2022मध्येही हाशि या बाथरूममध्ये पडल्याने जखमी झाल्या होत्या. त्या काठीच्या साहाय्याशिवाय चालू शकत नव्हत्या. त्याने पोलिसांना त्यावेळचे फोटोही दाखवले. पोलिसांनी हाशि सोम यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि पुढे तपास सुरू केला.
पोलिसांना घटनास्थळी एक सीसीटीव्ही कॅमेरा मिळाला. पण, त्याचं स्टोरेज मिळालं नाही. या घटनेच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने सीसीटीव्ही रेकॉर्ड झालेलं नसावं, अशी माहिती सूरजितने दिली. दरम्यान, पोलिसांना हाशि आणि शर्मिष्ठा यांचं नातं चांगलं नसल्याची माहिती मिळाली. त्या सीसीटीव्हीचं मेमरी कार्ड तपासल्यानंतर सगळ्या गुन्ह्याचा उलगडा पोलिसांना झाला. घटनेच्या दिवशी शर्मिष्ठा सकाळी साडे दहा वाजता आपल्या सासूच्या घरी गेली होती. तिच्या हातात तवा होता. ती सासूच्या पाठी स्वयंपाकघरात गेली. तो भाग सीसीटीव्हीत चित्रीत झाला नव्हता. पण, या सीसीटीव्हीत आवाज रेकॉर्ड झाला होता. त्यात रडण्याच्या आवाजासह अनेक आवाज ऐकायला येत होते. काही वेळाने ती बाहेर आली आणि तिने तवा एका कपड्याने पुसला, असं या चित्रीकरणात दिसून आलं.
8 मे रोजी पोलिसांना शवविच्छेदन अहवाल मिळाला. त्यात हाशि यांच्या शरीराव 14 जखमा आढळल्या. डोक्यावर झालेल्या जखमेमुळे हाशिचा मृत्यू झाला होता. त्याखेरीज उजव्या हाताला आणि शरीराच्या वरील भागावरही जखमा होत्या. त्या पडल्यामुळे झाल्या नव्हत्या तर कुणीतरी मारहाण केल्यामुळे झाल्या होत्या. या सगळ्या साक्षीपुराव्यांच्या आधारे पोलिसांनी शर्मिष्ठाला अटक केली.
























































