दाऊदचा खास पंटर लंबू शकीलचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

डॉन दाऊद इब्राहिमचा खास पंटर आणि 90 च्या दशकात दाऊद गँगचे स्मगलिंग व हवाला रॅकेट सांभाळणारा शकील अहमद शेख ऊर्फ लंबू शकील याचा जसलोक हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. छातीत दुखत असल्याने त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शनिवारी रात्री हदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला.

शकील अहमद हा दाऊद गँगमध्ये लंबू शकील म्हणून प्रसिद्ध होता. 90 च्या दशकात दाऊद गँगसाठी सोन्याची स्मगलिंग, शस्त्र व स्फोटकांची तस्करी तसेच हवाला रॅकेट चालविण्याचे काम लंबू शकील करायचा. तो छोटा शकीलसोबतसुद्धा गँगचे काम करीत होता. दरम्यान, देश सोडून तो बाहेर पळाला होता. 2003 मध्ये दुबईत तो पकडला गेल्यानंतर त्याला हिंदुस्थानात आणण्यात आले होते. सध्या तो दक्षिण मुंबईतील बोहरा मोहल्ल्यात पत्नी व पालकांसोबत राहत होता. छातीत दुखत असल्याने त्याला उपचारासाठी जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथेच शनिवारी रात्री त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे हॉस्पिटलच्या वतीने सांगण्यात आले. मात्र लंबू शकीलच्या मृत्यूसंबंधीची पूर्ण माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असेही सांगण्यात आले.