धमक्या देणाऱ्य़ा दाऊदच्या हस्तकाचे साथीदार रडारवर; तपासात धक्कादायक माहिती उघड, कोठडीत 19 तारखेपर्यंत वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते खासदार संजय राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख यांना आंतरराष्ट्रीय कॉल करून धमकावणारा दुबई रिटर्न दाऊदचा हस्तक पलाश बोस याच्या पोलिस कोठडीत 19 तारखेपर्यंत वाढ झाली आहे. दरम्यान, आजपर्यंतच्या त्याच्या चौकशीत काही धक्कादायक बाबी समोर आल्या असून त्याच्या आणखी साथीदारांना अटक होणार असल्याचे  एटीएसच्या सूत्रांकडून सांगण्यात येते.

कोलकात्यात राहणाऱ्य़ा पलाश बोस याने दुबईच्या सिमकार्डचा वापर करुन सिल्वर डायलर या अ‍ॅपद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी व्हच्र्यूअल काँल करून धमकी दिल्या होत्या. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांना दुबईच्या नंबरवरून धमकीचे मेसेज व व्हॉईस कॉल केले होते. याप्रकरणी संजय राऊत यांनी एटीएसकडे तक्रार दिल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जुहू युनिटचे वरिष्ठ निरीक्षक दया नायक व त्यांच्या पथकाने शिताफीने तपास करीत धमक्या देणार्या पलाश बोस या दाऊदच्या हस्तकाच्या कोलकाता येथे मुसक्या आवलल्या. त्याला मुंबईत आणून रविवारी सुट्टीकालीन कोर्टात हजर केले होते. कोर्टाने पलाशला बुधवार पर्यंत कोठडी दिली होती. आज कोठडीची मुदत संपल्याने पुन्हा कोर्टात हजर केले असता त्याची कोठडी 19 तारखेपर्यंत वाढवली.

मोबाईलमध्ये विविध अ‍ॅप

पलाशच्या मोबाईलमध्ये सिल्वर डायलर, फेक चॅट कन्व्हर्टर, व्हाईस चेंजर, फेक कॉल, फेक चॅट, हॅलो कॉल डायलर, फाईव्ह कार्ड डायलर असे अ‍ॅप्लिकेशन मिळून आले आहेत. शिवाय पलाशने धमक्या दिल्यानंतर त्यासाठी वापरलेले अ‍ॅपलिकेशन आणि मोबाईलमधील संभाषण डिलीट केले होते.