
जन्मदात्या आईची निर्घृण हत्या करून तिच्या काळजाचे तुकडे भाजून खाण्याचा प्रयत्न करणाऱया निर्दयी मुलाला जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. सुनील रामा कुचकोरवी (वय 35, रा. माकडवाला वसाहत, कावळा नाका) असे फाशीची शिक्षा झालेल्या मुलाचे नाव आहे.
कावळा नाका परिसरातील माकडवाला वसाहत येथे मयत यलव्वा कुचकोरवी ही मुलासह राहत होती. तिचा मुलगा सुनील कुचकोरवी हा व्यसनाधीन असल्याने तो वारंवार पैशासाठी आईशी भांडण करत होता. 28 ऑक्टोबर 2017 रोजी सुनील याने आईकडे दारूसाठी पैशांची मागणी केली. आई पैसे देत नसल्याच्या रागातून त्याने घरातील सत्तूरने वार करीत आईचा खून केला. निर्दयीपणाचा कळस म्हणजे त्याने आईच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. त्यानंतर ते भाजून खाण्याचा क्रूरपणा केला. शाहूपुरी पोलिसांनी या गुन्हाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश महेश जाधव यांच्यासमोर सुरू होती. सरकारी वकील ऍड. विवेक शुक्ल यांनी 12 साक्षीदार तपासले. खुनाच्या गुह्यात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही परिस्थितीजन्य पुराव्यावरून कोर्टाने आरोपीस दोषी ठरवले. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद, आरोपीविरुद्ध झालेल्या तक्रारी, हायकोर्टातील दाखल केलेले दाखले तसेच सदर गुन्हा हा दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा आहे. या गुन्ह्यात आईचा अमानुषपणे खून केलेला आहे. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी भारतीय दंड विधान संहिता कलम 302 खाली दोषी ठरवून नराधम सुनील कुचीकुरवी याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. तसेच, 25 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला.
या खटल्यात शाहूपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय मोरे, सहायक पोलीस निरीक्षक एम. एम. नाईक, सुरेश परीट, लोहार यांचे सहकार्य लाभले.
























































