पूर्णा तालुक्यातही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी – शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पूर्णा

पूर्णा तालुक्यात दुष्काळाची भयावह परिस्थिती असताना परभणी जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त यादीतून पूर्णा तालुका वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सोमवारी १५ रोजी शिवसेनेच्या वतीने पूर्णा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. पूर्णा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करुन महाराष्ट्र शासनाच्या दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ठ करावा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा एका निवेदनाद्वारे तहसीलदारांना देण्यात आला आहे.

जून ते सप्टेंबर या कालखंडात पूर्णा तालुक्यात ठरावी कालखंडात काही भागात पर्जन्यमान झाले तर काही भागात अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला. असे असताना पूर्णा तहसील कार्यालयाच्या महसूल प्रशासनाने चुकीचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केल्यामुळे महाराष्ट्र शासनाने संभाव्य दुष्काळग्रस्त तालुके घोषित केले आहेत. त्यामध्ये पूर्णा तालुक्याचे नाव नसल्यामुळे शेतकरीवर्ग नाराज झाला आहे. पूर्णा तालुक्यात सरासरी पेक्षा अल्पप्रमाणात पाऊस झाल्यामुळे त्याचा परिणाम सोयाबीन, कापूस, मूग, उडीद झाला आहे. तालुक्यातील गोदाकाठची गावे सोडली तर माणसांना पिण्यासाठी पाणी, जनावरांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऑक्टोबरच्या सुरुवातीलपासूनच निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणापैकी येलदरी, सिद्धेश्वर, जायकवाडी ही धरणे अल्पप्रमाणात भरली आहेत. यामुळे तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

तालुक्यातील महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मंडळविभगात जागेवर जाऊन दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करुन तसा आहवाल जिल्हाधिकारी परभणी व महाराष्ट्र शासनासास सादर करुन पूर्णा तालुका दुष्काळग्रस्तांच्या यादीत समाविष्ठ करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शिवसेना स्टाईलने रस्त्यावर उतरुन उग्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिले आहे. या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख दशरथ भोसले, तालुकाप्रमुख काशिनाथ काळबांडे, शहरप्रमुख मुंजा कदम, नगरसेवक श्याम कदम, संतोष एकलारे, साहेब कदम, अ‍ॅड. राजू भालेराव, माजी शहरप्रमुख नितीन कदम, उपतालुकाप्रमुख बालाजी वैद्य, गोविंद आवरगंड, सुदामराव डोईफोडे, सुदाम ढोणे, सरपंच तुकाराम सालपे, रमेश ठाकूर, कुंडलीक मोरे, नरहरी रुद्रवार, बंडूअप्पा बनसोडे, सोपानराव बोबडे, दशरथ बोबडे, बालाजी पिसाळ, कृष्णा बोबडे, बाबूराव चव्हाण, दिलीपराव आंबोरे, संजयराव मोहिते, कोंडीबा सोनटक्के, रामेश्वर हिंगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.