
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांच्या इयत्ता पहिलीच्या पटसंख्येमध्ये वाढ करण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र असे असले तरी मागील चार वर्षांमध्ये स्थानिक स्वराज्य शाळांच्या संस्थांमधील इयत्ता पहिलीच्या पटसंख्येमध्ये सातत्याने घट होते. मागील चार वर्षांत पहिलीच्या पटसंख्येत तब्बल 1 लाख 37 हजार 606 विद्यार्थ्यांची घट नोंदवण्यात आली.
2022-23 मध्ये 8 लाख 15 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. तर गतवर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 6 लाख 77 हजार 399 इतकी झाली आहे. म्हणजेच चार वर्षांत तब्बल 1 लाख 37 हजार 606 विद्यार्थ्यांची घट नोंदविण्यात आली आहे.
यूडास प्लसच्या आकडेवारीनुसार, 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये 8 लाख 15 हजार 5 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यानंतर 2023-24 मध्ये ही संख्या 7 लाख 45 हजार 639 वर घसरली. या एका वर्षात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 69 हजार 366 ने घट झाली. त्यानंतर 2024-25 मध्ये प्रवेशसंख्या 46 हजार 946 ने कमी झाली. 2024-25 मध्ये 6 लाख 98 हजार 693 इतक्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तर 2025-26 मध्ये विद्यार्थ्यांची घट कायम राहिली.
उपाययोजना करण्याच्या शाळांना सूचना
पटसंख्या वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेच्या परिसरातील अंगणवाडी व बालवाडी यांना शिक्षकांनी भेट देऊन त्यातील इयत्ता पहिलीमध्ये दाखल पात्र विद्यार्थी यादी घ्यावी. शिक्षकांनी अंगणवाडी ताई व पालक यांना भेटून 100 टक्के विद्यार्थी महानगरपालिका शाळेत दाखल व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत. महानगरपालिका शाळांमधील सोयी, सुविधा, शिष्यवृत्ती, उपक्रम याबाबत पालकांना माहिती द्यावी, अशा सूचना शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत.
मागील चार वर्षांतील आकडेवारी, वर्ष पहिलीला प्रवेश घेतलेले विद्यार्थी
- 2022-23 – 815005
- 2023-24 – 745639
- 2024-25 – 698693
- 2025-26 – 677399




























































