
>> दीपक भांबू जाधव
‘विद्वान कर्तृत्ववान माणसे नसली तरी चालतील, पण निष्ठेची माणसे हवीत. विद्येचा तुटवडा भरून काढण्यास मी खंबीर आहे, जो विकला जातो, लोभाला बळी पडतो, त्याचा काही उपयोग नाही.’ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लेखन आणि भाषणे, खंड 18, भाग – 3, पृष्ठ क्र. 7, दिनांक 14 जानेवारी 1946, सोलापूर). सध्या ‘निष्ठावान’ या चार अक्षरी शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. निष्ठावान कार्यकर्ता कसा असावा? त्यागी, प्रामाणिक, एकनिष्ठ, आपल्या समाजाप्रति इमान ठेवणारा, सचोटीने काम करणारा, कोणत्याही पदाची लालसा न बाळगणारा.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणाऱयांपैकी एक म्हणजे ‘ज. वि. पवार’ यांचे नाव घेतल्याशिवाय राहवत नाही. आज ज. वि. पवार यांचा वाढदिवस. आंबेडकरी चळवळीचे ते एक आधारस्तंभ आहेत. दलित पँथरचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, चालते बोलते विद्यापीठ, लेखक, कवी, सध्याच्या युगातील आंबेडकरी इतिहासाचे ‘गुगल’ आहेत. अशा कितीतरी बिरुदावल्या दिल्या तरी कमीच आहेत त्यांच्यासाठी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चार पिढय़ांसोबत कार्यरत राहणारे, डॉ. बाबासाहेबांचा सहवास लाभला नाही तरी त्यांचे सुपुत्र भैयासाहेब तथा यशवंत भीमराव आंबेडकर, डॉ. बाबासाहेब यांच्या दुसऱया पत्नी डॉ. माईसाहेब आंबेडकर, बाबासाहेब यांची नातवंडे प्रकाश तथा बाळासाहेब, आनंदराज भीमराव व पणतू सुजात आंबेडकर यांचे विश्वासू आहेत. सध्याच्या युगातील प्रिंट मीडिया असो किंवा टी.व्ही.चॅनल असो किंवा सोशल मीडिया असो, त्यांच्या वार्ताहरांना चळवळीच्या संदर्भात माहिती घ्यायची असेल, चर्चा करायची असेल तर प्रथम नाव ज. वि. पवार यांचे आठवते.
भीमा-कोरेगावची भूमिका अतिशय चिकित्सक, विश्लेषणात्मक, निर्भीडपणे मांडणारे ज. वि. पवार होते. डॉ. बाबासाहेबांचा आंबेडकरोत्तर इतिहास त्यांनी अतिशय सचोटीने, प्रामाणिकपणे जनतेसमोर चिकित्सक व पुराव्यासकट संशोधन करून लिहिलेला आहे. आजतागायत 30 पेक्षा जास्त पुस्तकांचे लेखन केलेले आहे. पाच हजारांपेक्षा जास्त लेख विविध नियतकालिके, वर्तमानपत्रे यांतून प्रसिद्ध झालेले आहेत. आंबेडकरी चळवळीचा संपूर्ण इतिहास सांगणारे 5 खंड प्रकाशित केलेले आहेत. दलित पँथरची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पत्रव्यवहाराची जबाबदारी ज. वि. पवार सांभाळायचे. डॉ. बाबासाहेब यांचे अत्यंत दुर्मिळ साहित्य डॉ. माईसाहेब आंबेडकर व भैयासाहेब आंबेडकर यांच्या सहमतीने प्रकाशित होऊ शकले व जनतेसमोर ऐतिहासिक दस्तऐवजांचा ‘ठेवा’ सुपूर्द केला. ज. वि. पवार हे सावलीसारखे भैयासाहेबांबरोबर असायचे. लेखक हा संशोधक असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे ज. वि. पवार. ते खऱया अर्थाने इतिहास संशोधक आहेत. ज. वि. पवार नेहमी प्रसिद्धीपासून लांब राहतात. हल्ली त्यांची दोन पुस्तके प्रसिद्ध झालीत.
एक ‘डॉ. बाबासाहेबांच्या चरित्र लेखनातील उणिवा’ व दुसरे ‘आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ’. पहिल्या पुस्तकात रमाईंची जन्मतारीख व विवाहसोहळा, जागतिक स्तरावरील एकमेव विद्यार्थीदशेतील आमदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाडचा रणसंग्राम- एक अपरिचित इतिहास, भारतीय संविधानाचा दडपलेला इतिहास, दादा मंडळी, आंबेडकर चरित्र लेखन की हनन? अशी अनेक अनभिज्ञ इतिहासाची उकल या पुस्तकातून केलेली आहे. दुसरे पुस्तकसुद्धा आंबेडकरोत्तर चळवळीशी संबंधित आहे. ज. वि. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नावाने शब्दसमुच्चयाने लेखनाची सुरुवात करणारे, समाज व चळवळ हेच आपले कुटुंब मानणारे, नेहमी साधी राहणी, कोणताही बडेजाव नाकारणारे, ‘मी पेन्शनर आहे’ असे जाहीर नम्रपणे सांगणारे, कोणत्याही पदाची लालसा न बाळगणारे, सत्कार समारंभ, मानमरातब यांच्यात कधीही न गुरफटणारे, आंबेडकरी चळवळीवरील हल्ले परतवून लावणारे आंबेडकरी निष्ठावान योद्धेच आहेत.




























































