
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग या सहा जिह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, ही मागणी रास्तच आहे. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच चर्चा करून स्वतः यात पाठपुरावा करू, अशी ग्वाही शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी दिली.
खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने आज सकाळी खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन या मागणीसाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली. यावेळी शिवसेना कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, राज्यसभेचे उमेदवार, जिल्हाप्रमुख संजय पवार आदी शिवसेना पदाधिकाऱयांसह जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. प्रशांत चिटणीस, ऍड. प्रकाश मोरे, ऍड. शिवाजी राणे, कृती समितीचे अध्यक्ष ऍड. गिरीश खडके, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे माजी सदस्य ऍड. महादेव आडगुळे आदी उपस्थित होते.
सहा जिह्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे म्हणून गेल्या 35 वर्षांपासून सर्व वकील आणि पक्षकारांकडून प्रदीर्घ आंदोलने सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या सरकारने सर्किट बेंचसाठी मंजुरी दिली आहे. पण, अजूनही त्याची पूर्तता झाली नाही. त्यामुळे सध्या येथे सर्किट बेंच होणे गरजेचे आहे. तसेच, कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिह्यांतील जनतेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे पक्षकारांना पूर्ण न्याय मिळण्यासाठी कोल्हापुरात खंडपीठ आवश्यक असल्याचे महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे सदस्य ऍड. विवेक घाटगे यांनी सांगितले. यापूर्वी पुणे येथे खंडपीठ होण्याची मागणी आता मागे पडल्याकडेही वकिलांनी लक्ष वेधले. तसेच, येथील सर्किट बेंचबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मत जाणून घेताना खंडपीठाबाबत पुण्याची मागणीच नसल्याने शरद पवार यांनीही कोल्हापुरात खंडपीठ स्थापनेबाबत सकारात्मकता दर्शविल्याचे वकिलांकडून सांगण्यात आले. या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी लवकरच चर्चा करण्यासह स्वतः पाठपुरावा करण्याचे आश्वासन खासदार संजय राऊत यांनी खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
…तर इतिहासात नोंद होईल
संजय पवार यांची इतिहासात नोंद होईल. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार हे या चळवळीतील घटक आहेत. त्यांच्या रुपाने शिवसेना कोल्हापूरला तिसरा खासदार देत आहे. त्यामुळे संजय पवार यांनी या खंडपीठप्रश्नी लक्ष घालून पाठपुरावा करावा. त्यांच्या कारकीर्दीत हे एक काम पूर्ण केले तर त्याची इतिहासात नोंद होईल, असेही खासदार संजय राऊत म्हणाले.


























































