‘ईव्हीएम’बाबत संशयाचे भूत कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव हा मतदानासाठी वापरण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनमुळेच झाला असल्याचा संशय विरोधकांकडून व्यक्त केला जात आहे. काँग्रेसच्या त्रुटींमुळे पराभव झाला की ‘ईव्हीएम’मधील घोटाळ्यामुळे याची शहानिशा काँग्रेस करणार आहे, तर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी ईव्हीएमविरोधात जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

ईव्हीएम मशीनच्या वापराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या मनात आजही शंका असल्याचे दोनच दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यापाठोपाठ काँग्रेस तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीदेखील ईव्हीएमच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित करत बॅलेट पेपरद्वारे निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला 303 तर काँग्रेसला केवळ 52 जागा जिंकता आल्या. भाजपविरोधात देशात वातावरण असताना आणि सर्व विरोधकांनी एकत्र येऊन निवडणुका लढल्या तरी अपेक्षित यश का मिळाले नाही याबाबत प्रत्येक मतदान केंद्रानुसार काँग्रेस विश्लेषण करणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेला फॉर्म क्रमांक 20 मधील माहिती सर्व उमेदवारांकडून मागविण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने त्यांच्या अंतर्गत व्यवस्थेतून प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय सर्वेक्षण करत मतदानाचा अंदाज घेतला होता. त्यातील माहिती आणि उमेदवाराला प्रत्यक्षात मिळालेली मते याची पडताळणी काँग्रेस करणार आहे. यामध्ये फारशी तफावत आढळून आली नाही तर कोणत्या कारणांमुळे मते कमी मिळाली याचा अभ्यास करून पक्ष संघटना बळकटीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

ईव्हीएमद्वारे नोंदविण्यात आलेली मते आणि काँग्रेसच्या सर्वेक्षणातील माहिती यामध्ये प्रचंड प्रमाणात तफावत आढळल्यास मतदान केंद्रांवर ‘ईव्हीएम’ मशीन हॅक करणे किंवा अन्य कोणत्या मार्गाचा अवलंब करून घोटाळा तर करण्यात आला नाही ना याची पडताळणी काँग्रेस पक्षाकडून केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक होण्याचे, ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप वारंवार फेटाळले असले तरी काँग्रेसच्या तपासणीत काय आढळून येते हे पाहण महत्त्वाचे ठरणार आहे.

ईव्हीएम निकाल म्हणजे जनादेश नाही
लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी करण्यात आलेला ईव्हीएम मशीनचा वापर हा शंकास्पद आहे. ईव्हीएम मशीनने दिलेला निकाल हा जनादेश नाही. लोकशाही वाचवायची असेल तर ईव्हीएमद्वारे घेण्यात येणारी मतदानाची पद्धत बंद करून बॅलेट पेपरचा वापर निवडणुकीत करावा अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ईव्हीएमच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना सोबत घेऊन देशभर जनआंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.