
>> नीलेश कुलकर्णी
प. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यांतील मतदान आता बाकी आहे. कसेही करून प. बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवायचीच या इरेला भाजप पेटला असल्याने सर्व मार्ग अवलंबण्यात आले. यंदाची तेथील निवडणूक म्हणजे दोन राजकीय पक्षांमधील ’ हातघाईची लढाई’च ठरली आहे. यानिमित्ताने बंगालमध्ये ’उठाव’ झाला असे एक चित्र निर्माण झाले. फक्त या उठावाची दशा आणि दिशा कोणती असेल, त्यामुळे राष्ट्रीय राजकारणाला कलाटणी मिळेल का, या प्रश्नांची उत्तरे 2 मे रोजीच मिळतील..
स्वातंत्र्यपूर्व काळापासून बंगालचे देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात मोलाचे योगदान राहिले आहे. बंगालच्या जनतेने यावेळी अभूतपूर्व लढाई पाहिली. हिंदुस्थान-पाकिस्तानप्रमाणे देशातले दोन राजकीय पक्ष बंगालमध्ये परस्परांना भिडले. महिला उमेदवारांच्या अंगावरचे कपडे फाडले गेले. लोकशाहीचे हे एक प्रकारे वस्त्रहरणच! ममतांना हरविण्यासाठी सगळे हथकंडे वापरले गेले. ममता जिंकल्या तर देशाच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळणार आहे. 2 मे रोजी काय घडते याकडे आता देश-विदेशातल्या नजराही लागल्या आहेत.
इतर राज्यांतल्या निवडणुका केवळ एक टप्प्यात उरकलेल्या असताना बंगालमध्ये निवडणूक अनेक टप्प्यांवर कोरोनाच्या साथीने पार पडल्या. यामागे मोठी रणनिती होती. प्रत्येक टप्प्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना कोंडित पकडायचे, त्या त्या टप्प्यानुसार ध्रुवीकरण करायचे, यात भाजप यशस्वी झाला. बंगालच्या निवडणुकीच्या तोंडावर बांगला देशात जाऊन पंतप्रधानांनी बंगालच्या निवडणुकीचा रीतसर नारळ तेथील कालिमाता मंदिरात फोडला. तिकडूनच मुस्लिम मतांनाही चुचकारले. त्यानंतर पंतप्रधान बंगाल प्रांतातच इतके रमले की, दिल्लीत ऑक्सिजनची बोंबाबोंब सुरू झाल्यानंतर आणि पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राने मदतीची तयारी दर्शविल्यानंतर पंतप्रधान दिल्लीत परतले. मोदी आणि अमित शहा यांनी भाजपसाठी प्रचंड मेहनत घेतली. जनतेला घरात बसा, काळजी घ्या असे सांगत त्यांनी लाखोंच्या सभा गाजवल्या. बंगालात ध्रुवीकरण करण्यात त्यांना यश मिळाले आहे.
शिवाय ममतादीदींच्या सरकारविरोधातील ‘ऍण्टी इनकम्बन्सी’चाही मोठा फॅक्टर आहेत. ममता यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधातील नाराजीही तृणमूल काँगेसला महागात पडू शकते. मात्र, त्याचवेळी आपल्याच एका बंगाली कन्येला हरविण्यासाठी दिल्लीतून कुमक आली, ही बंगाली अस्मिताही चवताळून उठलेली आहे. देशात कोरोनाने ऑक्सिजनविना रुग्ण तडफडून रस्त्यावर मरत असताना भाजपच्या जाहीर सभांचे कौतुक सोहळे बंगाली जनतेने ‘याचि देही याचि डोळा’ पाहिले आहेत. त्या लाटेवर स्वार होत ममतादीदींनी पुन्हा बंगाल ताब्यात राखला तर, देशातील मोदी सरकारसाठी ती धोक्याची घंटा ठरेल. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी मोठा फॅक्टर ठरतील. बंगालमध्ये जनतेने उठाव जरूर केला आहे. मात्र त्याची दिशा आणि दशा कोणती हे 2 मे रोजीच समजेल.






























































