
दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दिल्लीच्या कस्तुरबा गांधी आणि टोलस्टोय मार्गाजवळ एका एसयूव्ही गाडीने दोन बाईकस्वारांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघाता दरम्यान एकाने बाईकवरुन वेळीच उडी घेतली तर दुसरा तरुण गाडीने उडवल्यानंतर गाडीच्या टपावर जाऊन पडला. कहर म्हणजे अपघात झाल्यानंतर चालकाने गाडी न थांबवता मृतावस्थेत 3 किलोमीटर फिरवला.
दीपांशू वर्मा (30) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. मोहम्मद बिलाल या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, अपघात झाल्यावर गाडीच्या टपावर मृतदेह पडल्यानंतरही चालकाने गाडी थांबविली नाही. त्यानंतर मोहम्मदने गाडीचा त्याच्या स्कूटरने पाठलाग केला. वारंवार हॉर्न वाजवून गाडीला थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र गाडी थांबवली नाही. अखरे तीन किमी अंतर पार केल्यानंतर आरोपीने दिपांशूचा मृतदेह इंडिया गेटजवळ फेकला.
या अपघातात दिपांशूचा मृत्यू झाला तर त्याचा चुलच भाऊ मुकूल हा गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मिळालेल्या तक्रारीनुसार आरोपीला अटक केली आहे. हरनित सिंग असे आरोपीचे मान आहे. अपघातावेळी गाडीत त्याच्यासोबत त्याचे कुटुंबही प्रवास करत होते. दिपांशू त्याच्या आई-वडिलांचा एकुलता मुलगा आहे. गाडीत वडिल आणि बहिण असल्याने आणि ते अडचणीत येऊ नये यासाठी त्याने तिथून पळ काढला.




























































