
उत्तर दिल्लीतील मुकुंदपूर परिसरात मंगळवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. एका घरात एलपीजी सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला. यामुळे संपूर्ण घर कोसळले. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली असून ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकले. माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 11 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. यापैकी एका महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असून ती मोठ्या प्रमाणात भाजली आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना मुकुंदपूर-2, इशू विहार, गल्ली क्रमांक 1 मधील स्मशानभूमीजवळ घडली. दिल्ली अग्निशमन सेवेला सकाळी 9.37 वाजता या स्फोटाची आणि इमारत कोसळल्याची माहिती देणारा फोन आला होता. ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी दबले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आल्यामुळे बचाव पथके तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार, मोठ्या गॅस सिलेंडरमधून लहान सिलेंडरमध्ये गॅस भरण्याचे काम सुरू असताना हा स्फोट झाला असावा, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून काही सिलेंडर जप्त केले आहेत. तसेच, ज्या 250 चौरस यार्ड क्षेत्रफळाच्या घरात हा स्फोट झाला, तिथून भांडी रंगवण्याचा कारखाना चालवला जात होता, अशी माहिती आउटरनॉर्थचे पोलीस उपआयुक्त हरेश्वर स्वामी यांनी दिली.
स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की संपूर्ण परिसर हादरून गेला. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता तिथे सर्वत्र धुळीचे साम्राज्य होते आणि लोक मदतीसाठी ओरडत होते. काही लोक या घटनेचा व्हिडिओ बनवण्यात व्यग्र होते, तेव्हा त्यांना मोबाईल बाजूला ठेवून मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी हाताला लागतील त्या साधनांच्या मदतीने ढिगारा उपसण्यास सुरुवात केली. ढिगारा हटवताना स्वतः जखमी झालेल्या एका प्रत्यक्षदर्शी कामगाराने सांगितले की, स्वतःच्या दुखापतीची पर्वा न करता केवळ लोकांचे प्राण वाचवणे हेच आमचे लक्ष्य होते. सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी कोसळलेल्या इमारतीचा ढिगारा पूर्णपणे हटवत असून आत आणखी कोणी अडकले नाही ना, याची खात्री करण्यासाठी शोधमोहीम राबवत आहेत.

























































