रेल्वेही आता तोटय़ाच्या ट्रॅकवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आर्थिक मंदीचा जबरदस्त फटका उद्योगविश्वासह  सर्वच क्षेत्रांत बसला असतानाच केंद्र सरकारच्या ताब्यातील रेल्वेही तोटय़ाच्या ट्रकवर धावत असल्याची माहिती ‘कॅग’च्या अहवालात उघड झाली आहे. रेल्वेचा ऑपरेटिंग रेशिओ’ (कार्यरत प्रमाण) 98.44 टक्के झाला आहे. ही गेल्या दहा वर्षांतील सर्वांत वाईट स्थिती आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने चिंता वाढली आहे.

नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाने (कॅग) केंद्र सरकारला दिलेल्या अहवालात रेल्वेच्या स्थितीबाबतचे धक्कादायक चित्र स्पष्ट झाले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षाचा अहवाल आहे. हा अहवाल सोमवारी संसदेत मांडण्यात आला.

ऑपरेटिंग रेशिओ’ म्हणजे काय?

उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ साधणारी जी प्रणाली असते त्याला ‘ऑपरेटिंग रेशिओ’ असे म्हटले जाते. रेल्वे चालविण्यासाठी जेव्हा कमी खर्च येतो तेव्हा ‘ऑपरेटिंग रेशिओ’ कमी पण ऑपरेटिंग रेशिओ जास्त असतो तेव्हा रेल्वेची स्थिती चांगली नसल्याचे स्पष्ट होते. 2017-18 मध्ये ऑपरेटिंग रेशिओ 98.44 टक्के आहे, म्हणजेच जेव्हा रेल्वेला 100 रुपये उत्पन्न मिळते तेव्हा 98.44 रुपये खर्च होतात.

कॅग’ने काय म्हटले आहे

 2017-18 मध्ये रेल्वेचा ‘ऑपरेटिंग रेशिओ’ 98.44 टक्के आहे. दहा वर्षांतील हा सर्वाधिक रेशिओ आहे.

 प्रवासी भाडे, मालवाहतुकीव्यतिरिक्त जो अतिरिक्त महसूल रेल्वेला मिळतो त्यात तब्बल 66.10 टक्क्यांची घसरण झाली. 2016-17 मध्ये हा महसूल 4913 कोटी होता. 2017-18 मध्ये 1665.61 कोटी रुपये मिळाले.

 अंतर्गत उत्पन्नात 3.01 टक्क्यांनी घट झाली.

10 वर्षांतील ऑपरेटिंग रेशिओ

वर्ष रेशिओ

2008-09 90.48%

2009-10 95.28%

2010-11 94.59%

2011-12 94.85%

2012-13 90.19%

2013-14 93.06%

2014-15 91.25%

2015-16 90.49%

2016-17 96.50%

2017-18 98.44%