दिल्ली दंगलप्रकरणी 10 हजार पानांचे आरोपपत्र; उमर खलिद आणि शरजील इमामचे नाव नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्ली दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने तब्बल 10हजार पानांचे आरोपपत्र आज कडकडडूमा न्यायालयात सादर केले. या आरोपपत्रात एकूण 15 जणांविरोधात ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या आरोपपत्रात उमर खलिद आणि शरजील इमाम यांच्या नावांचा समावेश नसल्याची माहिती समोर आली आहे.  या दोघांची नावे पुरवणी आरोपपत्रात दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.

दिल्लीत फेब्रुवारीमध्ये घडलेल्या दंगलीमध्ये जवळपास 50 जणांचा मृत्यू तर 583 जण जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलकडे सोपविण्यात आला होता. दिल्ली पोलिस आयुक्तांनी नुकतेच याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याचे जाहीर केले होते. न्यायालयाने आरोपपत्र दाखल करण्यासाठी 17 सप्टेंबरची मुदत दिली होती. अखेर विशेष सेलकडून आज कडकडडूमा न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. दिल्ली दंगलप्रकरणी विशेष सेलने आतापर्यंत एकूण 20 जणांना अटक केली आहे. त्यापैकी 15 जणांच्या नावाचा समावेश या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या 15 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहेत. त्यात ताहीर हुसैन, मोहम्मद परवेज अहमद, मोहम्मद इलियास, सैफी खालिद, इशरत जहां, मीरन हैदर, सफूरा जरगर, आसिफ इकबाल तनहा, शाहदाब अहमद, नताशा नरवाल, देवांगना कलिता, तसलीम  अहमद यांच्या नावाचा समावेश असल्याचे कळते.