
सामना प्रतिनिधी । बीड
बीड, गेवराई आणि माजलगांव या तीनही शहरात सध्या तीव्र दुष्काळी परिस्थिती असून पैठण येथील जायकवाडी धरणातून माजलगांव धरणात 3 टि.एम.सी पाणी सोडण्याची आग्रही मागणी आ.जयदत्त क्षीरसागरांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे केली आहे.
सध्या बीड जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असून जायकवाडीतून माजलगांव धरणात 3 टि.एम.सी पाणी सोडणे आवश्यक आहे. जायकवाडी पात्रालगतच्या गेवराई, बीड व माजलगांव या तीन मोठ्या शहरांची पिण्याच्या पाण्याची गरज भागेल एवढी पाण्याची उपलब्धता अत्यंत आवश्यक आहे. बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार जायकवाडी प्रकल्पातून माजलगांव धरणात उजव्या कालव्याव्दारे 1.2 टि.एम.सी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु प्रत्यक्षात धरणात 50 टक्के पाणी पोहचले जाते. सोडलेल्या पाण्यापैकी केवळ अर्धा टि.एम.सी पाणी माजलगांव धरणात पोहचते ते पाणी अत्यंत अपुरे पडणार आहे. या तीन मोठ्या शहराला हे पाणी पुरणार नाही. पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेवून जायकवाडी धरणातून माजलगांव धरणात 3 टि.एम.सी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


































































