मराठमोळ्या डोंबिवलीत मराठी खाद्यपदार्थच झाले ‘उपरे’;चिवडा, थालीपीठ, लाडूची मागणी घटली

2939

संस्कृतीनगरी डोंबिवलीतच मराठी खाद्यसंस्कृतीची गळचेपी होत असल्याची बाब प्रकर्षाने समोर येत आहे. पौष्टिकपेक्षा फास्टफूड पदार्थांच्या खरेदीकडे तरुण पिढीचा कल वाढत आहे. पारंपरिक पदार्थांपेक्षा मॅगी, ब्रोकली हे जंकफूड खवय्यांना अधिक जवळचे वाटू लागले आहेत. परिणामी चिवडा, नाचणी सत्त्व, थालीपीठ, लाडू, शेव, पन्हे, कोकम या मराठमोळ्या पदार्थांच्या विक्रीला ब्रेक लागल्याने दुकानदार चिंतेत आहेत.

 डोंबिवली म्हटले की, मराठमोळी संस्कृती डोळ्यांसमोर येते. गुढीपाडव्याला येथे निघणारी मराठी नववर्षाची स्वागत यात्रा महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याशिवाय पोळी-भाजी केंद्र आणि मराठमोळ्या पारंपरिक पदार्थांच्या उलाढालीमुळे डोंबिवलीने मराठीपण टिकवून ठेवले. मात्र या मराठीपणालाच घरघर लागते की काय अशी अवस्था निर्माण झाली आहे. वर्षभराचा विचार करता मराठी पदार्थांच्या मागणीत 25 टक्के घट झाली आहे. मागणी घटल्याने अनेक दुकाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत, कारागीर बेरोजगार होत आहेत, गृहउद्योग धोक्यात आले आहेत.  मागणी घटण्याला फास्टफूड संस्कृती कारणीभूत असल्याची माहिती येथील प्रसिद्ध सुरस फूडचे मालक सुनील शेवडे यांनी सांगितले. मुलांपेक्षा पालकांनाच फास्टफूडचे आकर्षण जास्त वाटत असल्याने पौष्टिक पदार्थ हद्दपार होण्याच्या मार्गावर आहेत.

पूर्णान्न ते जंकफूड 

फास्टफूडमुळे मुलांची शारीरिक वाढ आणि बुध्यांक यावर परिणाम होत आहे. पूर्वी पूर्णान्न म्हणून नाचणी सत्त्व, थालीपीठ असे पदार्थ घेण्यासाठी ग्राहकांची दुकानात रांग लागत असे. मात्र आता याची जागा जंकफूडने घेतली आहे. जिभेचे केवळ चोचले पुरवणारे हे पदार्थ असून यामुळे शरीराला कोणतेच सत्व मिळत नाही. फास्टफूडचे आक्रमण पाहता यापुढे केवळ सण आणि उत्सव काळातच मराठमोळे पदार्थ विकले जातील की काय याची चिंता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या