मंत्रीपदाच्या लालसेपोटी लाचप्रकरणी भाजप आमदार नारायण कुचेवर गुन्हा दाखल करावा; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार नारायण कुचे यांच्यावर मंत्रीपदाच्या लालसेपोटी लाच दिल्याप्रकरणी लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली आहे.

बदनापुरचे आमदार नारायण कुचे यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे तथाकथीत पीए व दलाल नीरज सिंग यांना मंत्रीपदाच्या लालसेपोटी लोकप्रतिनिधी असल्याने शासकीय लाभाच्या पदासाठी पैशाची लाच देऊन कायद्याचा भंग केलेला आहे. याप्रकरणी नागपुर पोलिसांनी आरोपी निरज सिंग यांच्यावर गुन्हा सुध्दा दाखल झाला आहे. तसेच एका इलेक्ट्रॉनिक मीडीयाच्या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजप आमदार नारायण कुचे यांनी स्वतः भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे तथाकथीत स्वीय सहाय्यक निरज सिंग यांना 50 हजार रुपये व नंतर 2 लाख 36 हजार रुपये फोन पे वर लाच दिल्याचे कबुल केले आहे.

मंत्रीपदाकरिता लाच दिल्याप्रकरणी आमदार नारायण कुचे यांचे बँक खात्याची सखोल चौकशी करावी व त्यांच्यावर लोकप्रतिनिधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा व या गंभीर गुन्ह्याबद्दल कोणत्याही सार्वत्रीक निवडणुकीकरिता निवडणुक आयोगाच्या नियमानुसार फौजदारी गुन्हा दाखल करुन सहा वर्षाकरिता अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली आहे.