
‘संसार आलीया । एक सुख आहे । आठवावे रूप । विठ्ठलाचे…’ हीच ओढ मनी धरून श्रीविठ्ठल भेटीस आतूर झालेल्या वैष्णवांची मांदियाळी देहूत जमून आली आहे. टाळ-मृदंगाचा निनाद.. दिंडय़ा, भगव्या पताकांचा भार.. डोक्यावर तुळशी वृंदावन आणि मुखी विठूनामाचा गजर करीत येणाऱया भक्त – भागवतांच्या आगमनाने संत तुकोबारायाची देहूनगरी दुमदमली आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा विठूरायांच्या भेटीसाठी उद्या सोमवारी दुपारी अडीच वाजता श्री क्षेत्र देहूतून प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू नगरपालिका, पोलीस, आरोग्य विभाग सज्ज झाले आहेत.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या 337व्या पालखी सोहळय़ाचे सोमवारी आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. विधिवत, परंपरेनुसार होणाऱया पालखी सोहळ्याची जय्यत तयारी संत तुकाराम महाराज संस्थानने केली आहे. कोरोना महामारीच्या खडतर कालखंडानंतर यंदाची पायी वारी मोकळ्या वातावरणात होणार आहे. राज्य सरकारने सर्व निर्बंध उठवित यंदा पालखी सोहळ्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे समस्त वैष्णवजणांना आता सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस लागली आहे. संत तुकोबारायांच्या पालखी सोबत पांडुरंगाच्या भेटीला जाण्याचे वेध लागलेले हजारो वारकरी श्रीक्षेत्र देहूत दाखल झाले आहेत. राज्याच्या कानाकोपऱयातून आलेल्या वारकऱयांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यांच्या स्वागतासाठी देहूनगरीतील ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. पालखी मार्गावर जागोजागी कमानी उभारण्यात आलेल्या आहेत. देहूतील विविध सेवाभावी संस्था आणि ग्रामस्थांच्या वतीने अन्नदानासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. मुख्य देऊळवाडय़ात दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी होत आहे. देहू येथील विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात भाविकांनी दिवसभर गर्दी केली होती. दर्शनासाठी लांब रांगा लागल्या होत्या. पालखी प्रस्थान पूर्वसंध्येला देहूतील वातावरण भक्तिमय होऊन गेले आहे. इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला आहे. ‘ज्ञानेश्वर माउली, तुकाराम’ नामजपाने वातावरण भक्तिमय बनले आहे.
दर तीन तासांनी निर्जंतुकीकरण
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत तुकाराम महाराज मंदिर आणि परिसराचे दर तीन तासांनी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. देऊळवाडय़ाला आणि मंदिराला फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अब्दागिरी, गरुडटक्के, पादुका यांसह चांदीच्या रथालाही झळाळी देण्यात आली आहे.
- संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मुख्य गाभारा, भजनी मंडप, शिळामंदिर, महाद्वार, दर्शन मंडप, राममंदिर, चौघडाघर, दर्शनबारी आदी ठिकाणी 36, तर वैकुंठस्थान मंदिरात 10 सीसीटीव्ही पॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याचबरोबर पालखी रथावर लावण्यात आलेल्या पॅमेऱयांद्वारे सोहळ्यावर देखरेख ठेवण्यात येणार आहे.

































































